तमाशापंढरीत दिवसभरात अडीच कोटींची उलाढाल
By Admin | Updated: March 28, 2017 23:58 IST2017-03-28T23:58:55+5:302017-03-28T23:58:55+5:30
लोकनाट्य तमाशाचे माहेरघर असलेल्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून

तमाशापंढरीत दिवसभरात अडीच कोटींची उलाढाल
नारायणगाव : लोकनाट्य तमाशाचे माहेरघर असलेल्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढीपाडव्याचे औचित्य साधून तमाशाखेळाची सुपारी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेले गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्या गर्दीमुळे तमाशा पंढरीत यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या वर्षी दुष्काळी सावट असताना तमाशा क्षेत्राला चांगले वातावरण होते. मात्र यावर्षी नोटाबंदीचा फटका तमाशा बुकिंगवर दिसून आला आहे.
दिवसभरात २५० हून अधिक सुपाऱ्या तमाशाखेळाच्या गेल्या असून दिवसभरात अडीच कोटी रुपयांची उलाढाल तर एक महिन्यात ६०० खेळाच्या सुपाऱ्या जाऊन सुमारे ५ कोटींची उलाढाल या तमाशापंढरीत झाली असल्याची माहिती तमाशा फडमालक बाळ आल्हाट नेतवडकर यांनी दिली़
गुढीपाडवा हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह नगर, नाशिक, ठाणे या भागातील गावकऱ्यांची गर्दी झाली होती. आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गाव कारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व गाव ग्रामस्थ येथील ३० राहुट्यांमध्ये आले होते.
कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसासाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़, अशी माहिती विजय वाव्हळ, राजू सावंत, विशाल नारायणगावकर यांनी दिली .
यंदाच्या वर्षी तमाशापंढरीत रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे करवडीकर, अंजली नाशिककर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू , भिका-भीमा सांगवीकर, बाळ आल्हाट नेतवडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकरसह तुकाराम खेडकर, हरिभाऊ बढेसह नंदाराणी नगरकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, दत्ता महाडिक पुणेकर, कुंदा पाटील पुणेकर, काळू-नामू वेळवंडकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, संध्या माने सोलापूरकर, संभाजी जाधव संक्रापूरकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, ईश्वरबापू पिंपरीकर, छाया खिल्लारे बारामतीकर, भिका-भीमा सांगवीकर, मंगला बनसोडे करवडीकर, मनीषा सिद्धटेककर, नंदाराणी भोकरे साकुर्डीकर, वामनराव पाटोळे मेंढापूरकर, सर्जेराव जाधव दावडीकर, उषा पाटील खोमणे औरंगाबादकर, संगीता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, प्रकाश अहिरेकरसह नीलेशकुमार अहिरेकर, पुष्पा बरडकर कृष्णा वाघमोडे, सुनीता बारामतीकरसह रमेश खुडे आदी तमाशा फडाच्या राहट्या उभारण्यात आलेल्या आहेत. आदी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या राहुट्या या तमाशापंढरीत उभारल्या आहेत़. सर्वाधिक सुपारी रघुवीर खेडकर गेली त्यांची कालाष्टमी आणि पौर्णिमा ३ लाखांला गेली. नारायणगाव येथे तमाशा फडाच्या ३० राहुट्या आहेत. एका राहुटीत साधारणपणे १० ते १५ सुपाऱ्या बुक झाल्या आहेत़ (वार्ताहर)