पीएमपीच्या जागांना अडीच एफएसआय
By Admin | Updated: September 22, 2015 02:58 IST2015-09-22T02:58:49+5:302015-09-22T02:58:49+5:30
दिवसेंदिवस तोट्यात चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताब्यातील अस्तित्वातील जागांच्या पुनर्विकासासाठी अडीच एफएसआय देण्याबाबतचा फेरप्रस्ताव

पीएमपीच्या जागांना अडीच एफएसआय
पुणे : दिवसेंदिवस तोट्यात चाललेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताब्यातील अस्तित्वातील जागांच्या पुनर्विकासासाठी अडीच एफएसआय देण्याबाबतचा फेरप्रस्ताव पुणे महापालिकेने नुकताच पुन्हा राज्य सरकारकडे पाठविला आहे. तर, पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे हा निर्णय मार्गी लागल्यास पीएमपीला सक्षम उत्पन्न स्रोत मिळणार आहे. महापालिकेने यापूर्वी पाठविलेल्या प्रस्तावाबाबत राज्यशासनाने काही त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव नुकताच पाठविण्यात आल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
पीएमपीच्या मालकीच्या डेपोच्या जागा विकसित करण्यासाठी अडीच एफएसआय देण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. सर्वसाधारण सभेने त्याला वेळेत मान्यता न दिल्याने तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी त्यांच्या अधिकारात हा विषय मंजूर करून सरकारच्या अंतिम मंजुरीकरिता पाठविला होता. पुणे महापालिकेच्या प्रस्तावाबाबत सरकारने काही शंका उपस्थित करून त्याबाबत सविस्तर खुलासा मागविला होता. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकताच त्याबाबतचा सुधारित प्रस्ताव पुन्हा सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. ‘अडीच एफएसआयमुळे नक्की किती जागा उपलब्ध होऊ शकेल, त्यातून कसा फायदा होणार आहे, त्यापैकी व्यावसायिक वापरासाठी किती जागा देण्यात येईल, याबाबत सरकारकडून विचारणा करण्यात आली होती. त्याचे सविस्तर उत्तर पाठविण्यात आले आहे’, अशी माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. (प्रतिनिधी)