होर्डिंगच्या ठेकेदारांकडे सव्वाशे कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2015 23:59 IST2015-10-28T23:59:47+5:302015-10-28T23:59:47+5:30
शहरामध्ये होर्डिंग, फ्लेक्स लावणाऱ्या ठेकेदारांकडे १२५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी दिली

होर्डिंगच्या ठेकेदारांकडे सव्वाशे कोटी थकले
पुणे : शहरामध्ये होर्डिंग, फ्लेक्स लावणाऱ्या ठेकेदारांकडे १२५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी दिली. थकबाकीदारांकडे पाचपट दंडाची आकारणी केली आहे, हा दंड कमी करण्यासाठी थकबाकीदार न्यायालयामध्ये गेले असल्यामुळे त्यांचे परवाना नूतनीकरण करण्यात आले असल्याचे दहिभाते यांनी सांगितले.
शहरामध्ये किती अनधिकृत जाहिरात फलक आहेत, त्यावर काय कारवाई करण्यात आली आहे, याची विचारणा योगेश मुळीक यांनी प्रश्नोत्तरांतर्गत प्रशासनाकडे केली होती. त्यावर शहरामध्ये ८६ अनधिकृत फलक असून त्यापैकी ५३ फलकांवर कारवाई करण्यात आली व उर्वरित ३३ फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.
प्रशासनाकडून देण्यात आलेले उत्तर पूर्णपणे चुकीचे असल्याची टीका सभासदांनी केली. अनधिकृत फलकावरील कारवाईची क्षेत्रीय कार्यालयनिहाय माहिती मागितली असता, ती प्रशासनाला देता आली नाही. आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून जाहिरातींना परवानगी देण्यात आल्याचे अविनाश बागवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)