चोवीस तास पाणीपुरवठा मार्गी

By Admin | Updated: May 7, 2016 05:12 IST2016-05-07T05:12:50+5:302016-05-07T05:12:50+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी आणि प्रकल्पाची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या २०७ कोटींच्या

Twenty-four hours water supply | चोवीस तास पाणीपुरवठा मार्गी

चोवीस तास पाणीपुरवठा मार्गी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी आणि प्रकल्पाची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या २०७ कोटींच्या खर्चाला अखेर स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. या प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेबाबत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी २४ तास पाणी पुरविणे गरजेचे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. सरकारने पहिल्या टप्प्यात शहराच्या ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प प्रस्ताव मंजूर केला आहे.
केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पासाठी १४३ कोटी १७ लाख रुपये मंजूर केले आहेत. परंतु, त्यामध्ये प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या कामाचा समावेश नाही. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराच्या ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प दोन वर्षांत राबविण्यासाठी आणि या प्रकल्पाचे पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी निविदा मागविली होती. (प्रतिनिधी)

निविदाप्रक्रियेचा वाद
या प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेत स्पर्धा झाली नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांनी केला. प्रशासनाने ठरावीक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा काढली. त्यात स्पर्धा झाली नाही, असाही आरोप झाला. अखेर शुक्रवारी या विषयाला मंजुरी देण्यात आली.
विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराने २०७ कोटी ५८ लाख २९ हजार ४२४ रुपयांची व एसपीएमएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या ठेकेदाराने ३१६ कोटी ९२ लाख ३७ हजार ९१६ रुपयांची निविदा सादर केली आहे. यामध्ये कमी दराची निविदा सादर केलेल्या विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराला शहराच्या ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याची मान्यता दिली.

Web Title: Twenty-four hours water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.