बारा वर्षांच्या मुलीने लांबविले सात लाखांचे दागिने
By Admin | Updated: October 27, 2014 08:58 IST2014-10-27T03:30:34+5:302014-10-27T08:58:02+5:30
येथील भर चौकात असलेल्या सराफी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या माय-लेकरांनी दुकानातील सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

बारा वर्षांच्या मुलीने लांबविले सात लाखांचे दागिने
तळेगाव दाभाडे : येथील भर चौकात असलेल्या सराफी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या माय-लेकरांनी दुकानातील सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही चोरी एका १२ वर्षांच्या लहान मुलीने अवघ्या
काही मिनिटांत केली. विशेष म्हणजे त्या मुलीची ही हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील धनराज ज्वेलर्स या दुकानात १८ आॅक्टोबरला दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली.
समीर धनराज ओसवाल (वय ३७, रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलिसांत
फिर्याद दिली आहे. दुकानातील दागिन्यांची मोजणी करताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी बुधवारी (दि. २२) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर यांचे राजेंद्र चौकामध्ये धनराज ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. शनिवारी दुपारी एक महिला तेथे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. तिच्या सोबत तिचा मुलगा आणि बारा वर्षांची मुलगीही आली होती. दिवाळीचा सण असल्यामुळे दुकानामध्ये दागिने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. त्या वेळी दुकानामध्ये समीर एकटेच होते. या मायलेकरांनी गर्दीचा फायदा घेऊन दुकानातील सोन्याचे दागिने पळवले.
समीर यांनी महिलेला सोन्याचे दागिने दाखवले. त्यांनीही दागिने बघण्याचे नाटक केले. समीर दुसऱ्या ग्राहकास दागिने दाखवत असताना त्यांची नजर चुकवून या महिलेची मुलगी काऊंटर खालून आत गेली. आतील बाजूस असलेल्या खोलीच्या उघड्या दरवाजातून ही मुलगी आत गेली. खोलीमध्ये सोने ठेवण्यासाठी असलेल्या तिजोरीचा दरवाजा उघडून आतील दागिने एका कपड्यात गुंडाळून घेतले.
मुलीने चोरलेले दागिने मुलीने बाहेर येऊन आईकडे दिले. या महिलेने ते दागिने पर्समध्ये ठेवून दागिने पाहण्याचा बहाणा सुरूच ठेवला. थोड्या वेळाने महिला आणि तिची मुले दुकानातून निघून गेली. दुकानामध्ये गर्दी असल्यामुळे समीर यांना त्या वेळी चोरीचा संशयही आला नाही.
समीर यांनी नंतर दुकानातील दागिन्यांची मोजणी केली. त्या वेळी त्यांना सोन्याचे दागिने कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बारा वर्षांच्या मुलीने तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरल्याचे लक्षात आले. समीर यांनी दुकानातील असलेल्या दागिन्यांची आणि विक्री केलेल्या दागिन्यांची तपासणी केली. (वार्ताहर)