पावणेदोन कोटींची उलाढाल
By Admin | Updated: October 11, 2015 04:20 IST2015-10-11T04:20:10+5:302015-10-11T04:20:10+5:30
बैलपोळ्याच्या सणामुळे चाकण येथील जनावरांच्या बाजारात बैलांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. जनावरांच्या एकूण दोन कोटी ८९ हजारांपैकी एक कोटी ७० लाख रुपयांची

पावणेदोन कोटींची उलाढाल
चाकण : बैलपोळ्याच्या सणामुळे चाकण येथील जनावरांच्या बाजारात बैलांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. जनावरांच्या एकूण दोन कोटी ८९ हजारांपैकी एक कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल बैल बाजारात झाली असल्याची माहिती सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
सोमवारी भाद्रपदी बैलपोळा असल्याने शनिवारी बैलांचा मोठा बाजार भरला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैल विक्रीला आले होते. तर, बैलांसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठीही बाहेरच्या जिल्ह्यातून विक्रेते मोठ्या संख्येने बाजारात आले होते. त्यामुळे बाजाराला यात्रेचे स्वरूप आले होते. बैलपोळ्यामुळे बैलांना मोठी मागणी होती. या बाजारात ५०० बैल विक्रीसाठी आले होते. त्यापैकी केवळ ३७० बैलांची विक्री झाली. १० हजारांपासून ४० हजार रुपयांपर्यंत बैलांच्या किमती होत्या. गावरान, खिल्लारी, पंढरपुरी व गोऱ्ह्यांची मोठी विक्री झाली. या भागात बैलपोळा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्याने मराठवाडा, खान्देश, कोकण, विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून या बाजारात बैल विक्रीला आणले होते.
बैलगाडा शर्यती बंद झाल्या असल्या, तरी पोळ्याच्या सणाला दारात बैल असावेत म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर बैल खरेदी करण्यासाठी बाजारात येतात. दुष्काळी परिस्थिती व मंदीचे सावट असले, तरी सरतेशेवटी भरपूर पाऊस झाल्याने यंदा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. म्हणून बाजारात बैल खरेदीला मोठी गर्दी झाल्याचे बैलांचे व्यापारी दशरथ काचोळे, बाबाजी मांडेकर, बाळू काचोळे, बाळू तांबे, अब्बास पठाण, विठ्ठल इंदोरे, रामचंद्र पोखरकर, बाळू थोरात व शगीर काझी यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला असाही आधार
बैलपोळ्यानिमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांना मोठी मागणी होती. बाजारात रस्सी, मुसके, घंटी, घुंगर माळा, चमकीचे हार, कृत्रिम फुलांचे हार, चाबूक, कासरे, म्होरक्या आदी प्रकारचे साहित्य विकण्यासाठी व साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात मोठी गर्दी केली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथून आलेले विक्रेते केवट व घोडेबाजारहून आलेले पवार म्हणाले, की मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने आम्ही चाकणच्या बाजारात मोठ्या आशेने सामान विकण्यासाठी आलो आहोत. चाकणचा बैल बाजार प्रसिद्ध असल्याने आम्ही दर वर्षी या बाजारात येतो.