तुळशीबागेतील अतिक्रमणे हटविली

By Admin | Updated: May 19, 2015 01:09 IST2015-05-19T01:09:47+5:302015-05-19T01:09:47+5:30

तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली.

Tulshibaba encroach was deleted | तुळशीबागेतील अतिक्रमणे हटविली

तुळशीबागेतील अतिक्रमणे हटविली

पुणे : तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली. दिवसभर हा परिसर मोकळा दिसत होता. त्यामुळे भांडणानंतर, डोळे उघडलेले प्रशासन या पुढेही अशीच जागरूकता दाखविणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पालिकेने या परिसरात जोरदार कारवाई केली. बेलबाग चौक, बाबू गेनू चौक, तुळशीबाग परिसर आणि मंडई परिसराचा काही भाग, या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यात सुमारे ४१ पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
तुळशीबाग परिसरात रस्त्यावर पथारी मांडण्यावरून यापूर्वीही वाद झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी या परिसरात पथारी लावण्यावरून एकाचा धारदार शस्त्रांनी भर दिवसा खून झाला होता. त्यामुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी फेरीवाला संघटनांकडूनही केली जात होती. पालिकेने गेल्या काही दिवसांपासून त्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांची अनेकदा कानउघाडणी केलेली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रविवारी पुन्हा या ठिकाणी रसाचे गुऱ्हाळ लावण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून अतिक्रमणे रोखण्यात महापालिका प्रशासनास अपयश येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (प्रतिनिधी)

फिक्स पॉइंटचे काय झाले?
४या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असल्याने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फिक्स पॉइंट लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही काळ हा पॉइंटही लावण्यात आला होता. त्यानुसार, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी गस्त घालत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा फिक्स पॉइंटही बंद करण्यात आला आहे. तर महापालिकेचे पथक बाहेर पडताच अतिक्रमण करणारे पथारी व्यावसायिक तत्काळ गायब होतात. त्यामुळे प्रशासनाचा अतिक्रमणांना वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Tulshibaba encroach was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.