तुकाराम गाथा जीवनास तारक

By Admin | Updated: December 22, 2015 23:52 IST2015-12-22T23:52:26+5:302015-12-22T23:52:26+5:30

ज्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली, त्या ईश्वरी सत्तेचे स्वरूप अनाकलनीय आहे. संत तुकोबांची गाथा ही जीवनाला तारणारी आहे,

Tukaram saga is a living star | तुकाराम गाथा जीवनास तारक

तुकाराम गाथा जीवनास तारक

पिंपरी : ज्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली, त्या ईश्वरी सत्तेचे स्वरूप अनाकलनीय आहे. संत तुकोबांची गाथा ही जीवनाला तारणारी आहे, असे प्रतिपादन हभप प्रमोदमहाराज जगताप यांनी येथे केले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थ आयोजित महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात ‘तुकाराम गाथा’ या विषयावर प्रवचन देताना प्रमोदमहाराज जगताप बोलत होते.
‘कुमुदिनी काय जाणे तो हा परिमल’ या अभंगावर जगताप यांनी निरुपण केले. ते म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून परमेश्वराशी संवाद साधला
आहे. विज्ञान प्रगत झाले.
माणसाने मंगळावर स्वारी केली, तरी ईश्वरी सत्ता अनाकलनीय ठरली. देव कळणे कठीण गोष्ट आहे. मात्र ईश्वरी सत्तेलाही एक गोष्ट अनाकलनीय आहे. देवाला त्याचे नाव किती श्रेष्ठ आहे हेही अनाकलनीय आहे असे तुकाराम म्हणतात.’’ महोत्सवांतर्गत सकाळी गाथापारायण, दुपारी भजन आदी कार्यक्रम झाले.
गंगानगरात नाम यज्ञास सुरुवात
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेना व आध्यात्मिक केंद्राच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त गंगानगर, आकुर्डी येथील केंद्रामध्ये अखंड नाम, जप यज्ञ सप्ताहास धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. धार्मिक कार्यक्रमांसहित प्रबोधनात्मक व्याख्यान, विविध याग व सामुदायिक गुरुचरित्र, स्वामीचरित्र पारायणास प्रतिसाद मिळाला.
केंद्रामध्ये सप्ताहाची सुरुवात मंडलपूजा व सामुदायिक गुरुचरित्र, स्वामीचरित्र पारायणाने करण्यात आली. या वेळी गणेश याग, मनोबोध याग, श्री गीताई याग तसेच महिलांच्या प्रतिसादात श्री चंडीयाग पार पडला. सप्ताहामध्ये वैद्यकीय विभागातर्फे झालेल्या विनामूल्य रोगनिदान व उपचार शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘बालकांची भाषा समजून घेताना,’ ‘मानवी जीवनामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास,’ ‘लग्नाला सामोरे जाताना,’ ‘वास्तुशास्त्र समजून घेताना’ या विषयावर तज्ज्ञांनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी
विविध विषयांवर तज्ज्ञांना सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.
श्री स्वामी चरित्र सारामृत सामुदायिक ग्रंथवाचन २४ डिसेंबरला होणार आहे. रुद्र लिंगार्चन पूजन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
केंद्रामध्ये समर्थांची मूर्ती व प्रतिमेस आकर्षक व सजावट करण्यात आली आहे. २५ डिसेंबरला दत्त जयंतीनिमित्त महाआरती होणार आहे. सप्ताहाची सांगता २६ डिसेंबरला श्री सत्यदत्त पूजन व आरतीने होणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tukaram saga is a living star