मंगल कार्यालये फुल्ल; मुहूर्तात आले विघ्न
By Admin | Updated: March 11, 2015 00:57 IST2015-03-11T00:57:36+5:302015-03-11T00:57:36+5:30
लग्नघटिकेचा मुहूर्त साधण्यासाठी आता काही महिनेच उरले असताना शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग फुल्ल झाले आहे

मंगल कार्यालये फुल्ल; मुहूर्तात आले विघ्न
पिंपरी : लग्नघटिकेचा मुहूर्त साधण्यासाठी आता काही महिनेच उरले असताना शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग फुल्ल झाले आहे. परिणामी, रेशीमगाठी बांधण्याच्या तयारीतील वधू-वराकडील मंडळींची आता मंगल कार्यालयाच्या शोधासाठी चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यातही अपेक्षित ठिकाणाऐवजी मिळेल त्या दालनातच आपल्या पाल्यांचे मंगलकार्य उरकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे.
या वर्षीच्या लग्नसराईनुसार १२ जूनपर्यंतच लग्नाचे शुभमुहूर्त आहेत. त्यातही जूनपर्यंत ठरावीकच शुभमुहूर्त आहेत. अनेक जण काढीव मुहूर्तावर लग्न करण्याचे टाळतात. याचबरोबर जुलैपासून नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा १३ महिने चालणार आहे. त्यामुळे २०१५-२०१६ या वर्षातील लग्नसराईत (तुलसी विवाह ते गणेश चतुर्थीपर्यंत) तिथीनुसार लग्न करणे शक्य होणार नाही. यानंतर श्रावण महिन्यापासून चातुर्मास असल्याने २०१६च्या दिवाळीपर्यंत रेशीमगाठी बांधणे शक्य होणार नाही.
पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या परिसरात १००पेक्षा अधिक मंगल कार्यालये, लॉन्स व हॉल आहेत. त्यामध्ये भोसरी येथे सर्वाधिक ८ कार्यालये व लॉन्स आहेत. मोशी, चऱ्होली, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, रावेत, चिंचवड यासह विविध भागात कार्यालये आहेत. (प्रतिनिधी)