तुकोबांचा पालखीसोहळा आकुर्डी मुक्कामी
By Admin | Updated: July 10, 2015 01:45 IST2015-07-10T01:45:54+5:302015-07-10T01:45:54+5:30
पंजाबपासून कर्नाटकापर्यंतचे वारकरी हरिनामाचा गजर करीत आज सकाळी ११ वाजता देहूनगरीतून उत्साहाच्या वातावरणात टाळ-मृदंगाच्या व तुतारीच्या निनादात पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाली.

तुकोबांचा पालखीसोहळा आकुर्डी मुक्कामी
देहूगाव :
‘‘पुण्य उभे राहो आता ।
संताचिये कारणे ।।
पंढरीच्या लागा वाटे ।
सखा भेचे पांडुरंग ।।
या अभंगाप्रमाणे पंजाबपासून कर्नाटकापर्यंतचे वारकरी हरिनामाचा गजर करीत आज सकाळी ११ वाजता देहूनगरीतून उत्साहाच्या वातावरणात टाळ-मृदंगाच्या व तुतारीच्या निनादात पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाली.
पालखीला निरोप देण्यासाठी देहूगावासह, विठ्ठलनगर, चिखली, तळवडे, माळीनगर, येलवाडी, ाुदुंबरे,सांगुर्डी, कान्हेवाडी, झेंडेमळा, काळोखेमळा, किन्हई, चिंचोली परिसरातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तत्पूर्वी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात असलेल्या पालखीतील पादुकांची सकाळी नऊला परंपरेप्रमाणे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांच्या हस्ते विधिवत शासकीय महापूजा करण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार किरण काकडे, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अभिजित मोरे, विश्वस्त सुनील दामोदर मोरे, दिलीप मोरे इनामदार व प्रिया मोरे इनामदार आदी उपस्थित होते.
या पालखी मार्गावर ग्रामपंचायतीच्या चौकात, महाद्वार कमानीमध्ये वाल्हेकरवाडी येथील ज्योती कोल्हे यांनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या. पालखी महाद्वार कमानीमध्ये आल्यानंतर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. यानंतर पालखी दुपारी १२ वाजता अनगडशहावली बाबा दर्ग्याजवळ पहिल्या अभंग आरतीसाठी थांबली. येथे प्रथेप्रमाणे आरती झाल्यानंतर पालखी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली. या आरतीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, साहेबराव काशीद, माजी नगरसेवक जयंत बागल उपस्थित होते. झेंडेमळा येथील देहू शस्त्रास्त्र भांडाराच्या प्रवेशद्वारात आदेशक ब्रिगेडियर नरेंद्र पटेल, कर्नल सुरेशकुमार यांनी स्वागत केले. या वेळी सीओडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मयूर डोळस व सचिव महेंद्र कांबळे, पदाधिकारी धनंजय शेटे, सुनील दाभाडे आदी उपस्थित होते.
चिंचोलीत पालखी आल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी केली. शनिमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय जाधव व धनंजय सावंत यांच्या हस्ते दुसरी अभंग आरती झाली. कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी व उपाध्यक्ष राहुल बालघरे यांनी स्वागत केले. या वेळी नगरसेवक बाळासाहेब तरस, रेड झोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, बाळासाहेब जाधव, सचिव रमेश जाधव, नगरसेवक रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल,अरुणा पिंजण, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक संभाजी भसे आदी उपस्थित होते. देहूरोड येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या वतीने महाप्रबंधक आर.के. तिवारी यांनी स्वागत केले.
आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका, ठिकठिकाणी डॉक्टरांचे पथक, कॅन्टोन्मेंट बोर्ड व लायन्स क्लब, पवना हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सुविधा व औषधे पुरविली. महसूल विभागाच्या वतीने अप्पर तहसीलदार किरण काकडे यांनी वृक्षारोपण केले. या वेळी कृषी सहायक सुनील राजे व प्रदीप काळोखे, मंडल अधिकारी चंद्रकांत पाटील, मिलिंद मनवर आदी उपस्थित होते. येथील श्री शिवाजी विद्यालयातील स्काऊट व गाइडच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून पालखीसोहळ्यात मुली वाचवा, पाणी वाचवा, अशा प्रकारचा संदेश दिला. यात प्राचार्य काशीनाथ नवले, पर्यवेक्षक प्रवीण गणबोटे, बाबाजी आहेर, रंजना सपकाळे, सविता नाणेकर, माधुरी खालकर, अनुराधा घोडके, नीलेश मानकर, अरुण कदम व श्री कांबळे यांनी सहभाग घेतला. देहूगाव येथे शिरीषकुमार मित्र मंडळाने अन्नदान केले. रोटरी क्लब आॅफ देहूगावच्या वतीने प्लॅस्टिकचे कागद वाटले. (वार्ताहर)