टवाळखोरांना चोपले
By Admin | Updated: October 31, 2015 01:04 IST2015-10-31T01:04:33+5:302015-10-31T01:04:33+5:30
महाविद्यालयीन परिसरात मुलींची छेडछाड करणे, रॅश ड्रायव्हिंग, विनाकारण वारंवार फेऱ्या मारणे अशा ५८ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला

टवाळखोरांना चोपले
पिंपरी : महाविद्यालयीन परिसरात मुलींची छेडछाड करणे, रॅश ड्रायव्हिंग, विनाकारण वारंवार फेऱ्या मारणे अशा ५८ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. एकाच दिवशी, एकाच वेळी केलेल्या या धरपकड कारवाईमुळे टवाळखोरांची धावपळ उडाली. पोलिसांनी काठीचा ‘प्रसाद’ही दिला.
गेल्या आठवडाभरात शहरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या. यासह इतर गुन्ह्यांमध्येही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी परिमंडळ तीन अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, आकुर्डी या भागातील महाविद्यालय परिसरात एकूण ५८ जणांवर
कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. यापुढेही टवाळखोरांवरील कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
तीन दिवसांपूर्वी चिखली परिसरात वाहनांची तोडफोडप्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये सात आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले. केवळ गोंधळ निर्माण करणे, दहशत माजविणे यासाठी तोडफोड केल्याचेही समोर आले.
शुक्रवारी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान धरपकड मोहीम राबविली. यासाठी शहरातील काही महाविद्यालये निवडण्यात आली. त्या परिसरात साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात केले. महाविद्यालयाचे प्रवेशद्वार, रस्त्याच्या बाजूला व इतर परिसरात टोळक्याने उभे राहून मुलींची टिंगलटवाळी करणे, छेड काढणे, सुसाट वेगात वाहन चालवून स्टंटबाजी करणे अशा टवाळखोरांना ताब्यात घेतले. या धरपकडीत टवाळखोरांची धावपळ उडाली.
काही टवाळखोरांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला.
या धरपकडीच्या कारवाईत पोलिसांनी विविध महाविद्यालयांच्या ठिकाणाहून एकूण ५८ जणांना ताब्यात घेतले. यासह त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या. तर अठरा वर्षांपुढील टवाळखोरांना ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)