रावणगावमध्ये दिसली खरी माणुसकी, पीपीई किट घालून वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST2021-05-09T04:10:38+5:302021-05-09T04:10:38+5:30
गावचा कारभारी फक्त कडक भट्टीची कपडे घालून लोकांसमोर मोठेपणा मिरवण्यासाठी नसतो तर एखाद्याच्या अडचणीच्या काळात स्वत:ची परवा न करता ...

रावणगावमध्ये दिसली खरी माणुसकी, पीपीई किट घालून वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार
गावचा कारभारी फक्त कडक भट्टीची कपडे घालून लोकांसमोर मोठेपणा मिरवण्यासाठी नसतो तर एखाद्याच्या अडचणीच्या काळात स्वत:ची परवा न करता इतरांच्या मदतीला धावून जाणारा असतो. हाच अनुभव दौंड तालुक्यातील रावणगाव येथे आला.
रावणगाव येथील एका शिक्षिकेच्या वयोवृद्ध आईचा शुक्रवारी कोरोनाने घरातच मृत्यू झाला. गावात जवळचे किंवा भावकीचे कोणीच नसल्याने त्या मृतदेहाला कोण उचलणार हा प्रश्न ग्रामस्थांच्या समोर उभा राहिला. बराच वेळ झाला तरी मृतदेह उचलायला कोणीही पुढे येत नव्हते.
अशावेळी रावणगावचे रहिवासी असलेल्या पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे ह्यांनी जिवावर उदार होऊन मोठे धाडस केले. आटोळे यांनी स्वतः पीपीई किट घातले. तसेच रावणगाव सोसायटीचे संचालक दत्तु अडसूळ यांनीही पीपीई किट घातले. आणि नंतर दोघांनी घरामध्ये जाऊन मृतदेह बाहेर काढून रावणगावच्या स्मशानभूमीत नेऊन मृतदेहावर सर्व सोपस्कार पूर्ण करून अंत्यसंस्कार केले.