फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत
By Admin | Updated: August 20, 2015 02:34 IST2015-08-20T02:34:54+5:302015-08-20T02:34:54+5:30
इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात चांगलाच रंग भरला आहे

फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत
पळसदेव : इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात चांगलाच रंग भरला आहे. काही विजयी उमेदवार अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत, तर काही ‘मेंबर’ निकाल लागल्यापासून गायब झाले.
सरपंचपदाच्या निवडीत काही दगाफटका होऊ नये, म्हणून सरपंचपदाचे दावेदार विजयी उमेदवारांच्या सरबराईत गुंतले आहेत. त्यामुळे ‘सरपंचपदासाठी काय पण...’ अशी असा पणच दावेदारांनी केला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये १५ ते २० वर्षांपासून असणारी सत्ता मतदारांनी उलथवून टाकली. आता सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडून आलेल्या पॅनलमध्ये फूट पडल्याचेही चित्र काही गावांमध्ये दिसत आहे.
सरपंचपदाची अडीच वर्षांसाठी वाटणीही काही गावांमध्ये केली जात आहे. तर, काही ठिकाणी मीच कसा सरपंचपदासाठी लायक आहे, असे दावेदार तावातावाने सांगत आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांच्या आणि दावेदारांच्या गुप्त बैठकाही सुरू आहेत. ज्या गावांमध्ये काठावरचे बहुमत आहे, त्या गावांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. गावकीच्या राजकारणात सरपंचपद प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने विजयी उमेदवारांना लाखोच्या ‘आॅफर’ दिल्या जात आहेत.
दरम्यान, निकाल लागल्यापासून अनेक नवनिर्वाचित मेंबर गोवा, महाबळेश्वर, तर काही श्रावण महिन्यानिमित्त १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेस गेल्याची चर्चा ग्रामस्थांमधून ऐकण्यास मिळत आहे.