आदिवासी बांधवांचा अन्यायाविरोधात आक्रोश
By Admin | Updated: November 14, 2016 02:05 IST2016-11-14T02:05:51+5:302016-11-14T02:05:51+5:30
कुठे कुपोषण...कुठे उपोषण.. कुठे बलात्कार.. आदिवासी किती काळ सहन करणार अत्याचार?, एक तीर एक कमान सारे आदिवासी एकसमान, आदिवासी संस्कृती अपनाओ, विश्वको बचाओ

आदिवासी बांधवांचा अन्यायाविरोधात आक्रोश
डिंभे : कुठे कुपोषण...कुठे उपोषण.. कुठे बलात्कार.. आदिवासी किती काळ सहन करणार अत्याचार?, एक तीर एक कमान सारे आदिवासी एकसमान, आदिवासी संस्कृती अपनाओ, विश्वको बचाओ, अशा घोषणा देत शुक्रवारी घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे खामगाव तालुक्यातील पाळा आदिवासीआश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आदिवासी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पाळा येथील आश्रम शाळेत घडलेल्या घटनेचा निषेध करत मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आदिवासी समाजाच्या वतीने आंबेगाव तालुका तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. मोेर्चात उत्तर पुणे जिल्ह्यामधून हजारोंच्या संख्येने आदिवासीबांधव, महिला व तरुणवर्ग सामील झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील कै. निंबाजी कोकरे या आदिवासी आश्रमशाळेत निवासी वसतिगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन आदिवासी चिमुरडीवर कर्मचाऱ्यांनीच बलात्कार करून तिचा वारंवार लैंगिक छळ करण्याची घटना समोर आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, सुभाष मोरमारे, विजय आढारी, सुभाष तळपे, संजय गवारी, प्रकाश घोलप, जनाबाई उगले, मारुती केंगले, राजू घोडे; तर आदिवासी क्रांती संघटना, आदिवासी विकास मंडळ आंबेगाव, आदिवासी उन्नती संघटना खेड व मावळ, यशोधा फाउंडेशन अकोले, आदिवासी संस्कृती मंडळ इगतपुरी नाशिक आदी मोर्चात सहभागी झाले होते.