सुपे-मेडद गटात तिरंगी लढत
By Admin | Updated: February 13, 2017 01:27 IST2017-02-13T01:27:57+5:302017-02-13T01:27:57+5:30
तालुक्यातील सुपे परगण्यातील लढत यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. सध्या सुपे-मेडद

सुपे-मेडद गटात तिरंगी लढत
बारामती : तालुक्यातील सुपे परगण्यातील लढत यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. सध्या सुपे-मेडद गटातील सुपे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपासह अपक्ष उमेदवाराच्या तिरंगी लढतीचे चित्र आहे.
सोमवारी (दि. १३) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी या गणातील लढतीचे चित्र स्पष्ट
होणार आहे.सुपे मेडद गट जिरायती भागातील परिसर आहे. सुपे परगणा म्हणून या भागाला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला याच गणामध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी विद्यमान पंचायत समिती सदस्या मालन ज्ञानेश्वर कौले निवडून आल्या होत्या. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कौले यांच्या त्या पत्नी आहेत.
मागील निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा या गणातील लढत प्रतिष्ठेची केली आहे.
यंदा गण ओबीसी महिला राखीव आहे. भाजपाच्या वतीने पुन्हा विद्यमान सदस्या कौले यांनाच
निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नीता संजय बारवकर यांना सुपे गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर काळखैरेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या मोहिनी गणेश खैरे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सध्या तरी या गणामध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने या गणातील लढतीवर राष्ट्रवादीने चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. अपक्ष उमेदवाराने अर्ज माघारी
घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)