एस टी डेपोचा आवारातील झाड कोसळून रस्त्यावर
शिरूर : शिरूर सेंटर शाळेसमोर एसटी डेपोच्या आवारातील झाड रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण ठप्प झाला होता. वेळीच त्या परिसरात बसणारे भाजीविक्रेते दूर पळाल्याने जीवितहानी टळली गेली.
सध्या शिरुर एसटी डेपोच्या बांधकामाचे काम सुरु आहे. याच डेपोच्या मागील बाजूस कंपाउडच्या भिंतीलगत असणारे जुने गुलमोहराचे झाड रविवार दि. ५ रोजी दुपारच्या सुमारास पडले. या कंपाउडचा भिंतीचा बाहेरील बाजूस भाजीविक्रेते भाजी विक्रीसाठी बसत असतात. त्याचबरोबर गावातून जाणाऱ्या पुणे नगर रस्त्याचे काम चालू असल्याने एसटी डेपोच्या मागील रस्त्यावरुन गावातून जाणाऱ्या या पुणे नगर रस्त्याने जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याच बरोबर छत्रपती संभाजीनगर ,यशवंत वसाहत सैनिक वसाहत व कॉलेजकडे या रस्त्याने लोक जात असतात. साहजिकच मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर वर्दळ असते. रविवार असल्याने या रस्त्यावर वर्दळ कमी होती. दुर्दैवाने वर्दळीचा वेळेस झाड पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागी झाडाच्या फांद्या पडल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्ण ठप्प पडली होती. उशिरापर्यंत झाडांच्या फांद्या दूर करायचे काम सुरु होते.