पारदर्शक कारभारासाठी कारभारी बदला : तावडे
By Admin | Updated: February 17, 2017 04:35 IST2017-02-17T04:35:33+5:302017-02-17T04:35:33+5:30
पुणे जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे सत्तेत बसलेल्यांनी खोटे बोलून जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी विकासकामे केली नाही. पारदर्शक

पारदर्शक कारभारासाठी कारभारी बदला : तावडे
मंचर : पुणे जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे सत्तेत बसलेल्यांनी खोटे बोलून जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी विकासकामे केली नाही. पारदर्शक कारभारासाठी पुणे जिल्हा परिषदेचे कारभारी बदला, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
तावडे यांची मंचर येथे गुरुवारी जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, उमेदवार ताराचंद कराळे, वैशाली बाणखेले, संजय थोरात, कैलास राजगुरव, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, की सत्तेचा गैरवापर करणारांची आता गय केली जाणार नाही. विरोधकांच्या सभेला आलेल्यांना बदली करण्याची धमकी दिली जाते. चौकशी करू असे सांगितले जाते. अशी धमकी ज्यांना मिळाली आहे; त्यांना आम्ही बढती देऊ, असे आश्वासन देत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत सत्तेत असताना जो भ्रष्टाचार केला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी आपला अध्यक्ष झाल्यावर करू, असे शेवटी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की आढळराव पाटील, वळसे पाटील यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच केले नसल्याने त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आचारसंहिता संपली की शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटून शर्यती सुरू करू.
या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांचीही भाषणे झाली.