तब्बल १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: July 10, 2015 02:14 IST2015-07-10T02:14:28+5:302015-07-10T02:14:28+5:30
महापालिकेत नियुक्ती एकीकडे, तर काम दुसरीकडे अशापद्धतीने वर्षानुवर्षे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या विभागांमध्ये ठाण मांडून बसलेल्या १५१ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली आहे.

तब्बल १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे : महापालिकेत नियुक्ती एकीकडे, तर काम दुसरीकडे अशापद्धतीने वर्षानुवर्षे बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या विभागांमध्ये ठाण मांडून बसलेल्या १५१ अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने बदलीच्या आदेशामध्ये दिला आहे.
शासनाच्या सेवा नियमावलीनुसार महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर ३ वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे हितसंबंध तयार होऊ नयेत याकरिता हा दंडक घालून देण्यात आला आहे. मात्र,पुणे महापालिकेमध्ये या नियमाला धाब्यावर बसवून अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करीत होते. बदली झाल्यानंतरही ते त्याच विभागात कार्यरत राहत होते. स्वयंसेवी संस्थांनी याबाबत आवाज उठविला होता, नगरसेवकांनीही मुख्य सभेमध्ये या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्या वेळी नियमित बदल्यांच्यावेळी या अधिकाऱ्यांची बदली केली जाईल, असे आश्वासन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी १५१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
बांधकाम विभागातील ३८, पाणीपुरवठा विभागातील २९ अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. या दोन विभागांतून अधिकारी बदलीच होऊ देत नव्हते. बदली झाली तरी विभागप्रमुखांच्या आशीर्वादाने ते पुन्हा त्याच विभागात कार्यरत राहत होते. विभागप्रमुखांनी कार्यमुक्त न केल्याने अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नव्हत्या. यंदा मात्र बदली झालेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. साहेबराव दांडगे, श्रीकांत वायंदडे, राजेंद्र वायकर यांची बांधकाम विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. मिलिंद बापट यांची बांधकाम विभागातून भवन रचना विभागात, राजेंद्र थोरात पाणीपुरवठा विभागातून बांधकाम विभागात, जयंत वाघ यांची भवन रचना विभागातून उद्यान विभागात, जयंत पवार यांची बांधकाम विभागातून उद्यान विभागात, सुरेश साळवे यांची पथ विभागातून ड्रेनेज विभागात, अजयकुमार वायसे यांची पाणीपुरवठा मधून बांधकाम, धनंजय जाधव, सुधीर कदम यांची बांधकाम विभागातून क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई
बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी रूजू झाल्याचा अहवाल विभागप्रमुखांनी अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. बदली रद्द करण्यासाठी राजकीय किंवा इतर दबाब आणल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.