त्या विद्युत कर्मचार्‍यांची बदली

By Admin | Updated: May 7, 2014 01:12 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T01:12:27+5:30

कर्मचा-याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची महावितरणे अखेरीस बदली केली आहे.

Transfer those electric employees | त्या विद्युत कर्मचार्‍यांची बदली

त्या विद्युत कर्मचार्‍यांची बदली

पुणे : अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विद्युत कर्मचार्‍याची पत्नी मिनाक्षी दिलीप मगर यांनी महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर महावितरणने त्या अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली केली. मात्र पतीच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या व्यक्तींची केवळ बदली न करता त्यांना निलंबित करुन अटक करावी अशी मागणी करीत मंगळवारी (दि.६) रास्तापेठेतील महावितरणच्या मुख्यालयासमोर त्यांनी पुन्हा आंदोलन केले.
हडपसर उपविभागात (ग्रामीण) तंत्रज्ञ दिलीप मगर यांनी वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कार्यालयातील शिवाजी भामघर यांचा विद्युत अपघातात मृत्यु झाला होता. या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी माझ्या पतीवर दबाव टाकण्यात येत होता. यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मिनाक्षी यांनी महावितरणचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणी सहाय्यक अभियंता किशोर शिंदे, शाखा अभियंता ए. आर. लांजेवार, कनिष्ठ लिपिक एस. के. दरेकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाकडून जामिन मिळाल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजु झाले आहेत. त्यांच्याकडून कार्यालयीन कागदपत्रात खाडाखोड करुन माझ्या पतीविरुद्ध ते खोटे रेकॉर्ड तयार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर निलंबनाची कारवाई करुन खातेनिहाय चौैकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती.
महावितरणने शिंदे यांची पुणे विभागात (इन्फ्रा), लांजेवार यांची मुळशी उपविभागातील पौड शाखेत,तर दरेकर यांची तळेगाव उपविभागात बदली केली आहे.
लीगल राईट्स सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी म्हणाले, ऊर्जा विभाग दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. या विरोधात महावितरण व ऊर्जा विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.

Web Title: Transfer those electric employees