बदलीचे नाट्य जिल्हा परिषदेतही
By Admin | Updated: October 28, 2015 23:53 IST2015-10-28T23:53:34+5:302015-10-28T23:53:34+5:30
जिल्हांतर्गत समायोजनच्या बदल्यांमध्ये मुळशी तालुक्यातील ‘त्या’ तीन शिक्षिकांच्या बदलीचे नाट्य आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनातही रंगले

बदलीचे नाट्य जिल्हा परिषदेतही
पुणे : जिल्हांतर्गत समायोजनच्या बदल्यांमध्ये मुळशी तालुक्यातील ‘त्या’ तीन शिक्षिकांच्या बदलीचे नाट्य आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनातही रंगले. मात्र, प्रशासनाची भूमिका समजून घेतल्यानंतर घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत त्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात तेथेच रुजू होण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले.
माण शाळेसाठी दोन व भूकुमसाठी एका शिक्षिकेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या स्वाक्षरीने थेट नियुक्ती आदेश एक महिन्यापूर्वीच (२४ सप्टेंबर २०१५) देण्यात आले होते. मात्र, त्या शिक्षिकांना आता मान व भूकुमऐवजी शिंदेवाडी, उरावडे व भरे येथील शाळांवर पंचायत समिती प्रशासनाने तात्पुरती नियुक्ती दिली आहे. याबाबतचे नाट्य सुरू आहे. ‘त्या’ गेल्या महिनाभरापासून पंचायत समितीत बसून आहेत.
याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी याची दखल घेत मुळशीच्या गटविकास अधिकारी व सभापतींना तातडीने जिल्हा परिषदेत बोलवून घेतले. याचा त्यांना जाब विचारला. जर जिल्हा परिषदेने तसे आदेश दिले असताना तुम्ही परस्पर बदल कसे केले. याबाबत गटविकास अधिकारी शालिनी कडू यांनी अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडली. मुळशीत सध्याच्या परिस्थितीत ६८ शिक्षक कमी आहेत. जिल्हा परिषदेने आम्हाला फक्त तीन शिक्षक दिले. ते शिक्षकही थेट नियुक्ती आदेशाने मिळाले. त्यामुळे आम्ही पंचायत समितीच्या बैठकीत चर्चा करून त्या तीन शिक्षकांना ज्या शाळा सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांअभावी बंद आहेत. त्या शाळा देण्याचे ठरले. जेव्हा इतर शिक्षक मिळतील तेव्हा त्यांना पुन्हा मिळालेल्या शाळा दिल्या जातील, असे ठरवले.
हे स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी शैैक्षणिक अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हा हेतू असल्याने ‘त्या’ तीन शिक्षकांना प्रशासनाने दिलेल्या शाळांवर तात्पुरत्या स्वरूपात काम करावे, असे सांगितले.
याबाबत मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांच्याशी संपर्क साधला असता, शैैक्षणिक अडचण व मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षक मिळाल्यानंतर त्यांना दिलेल्या शाळा पुन्हा दिल्या जातील, असे सांगितले. (प्रतिनिधी)