प्रवाशांना लुटणारी टोळी जाळ्यात
By Admin | Updated: June 29, 2017 03:40 IST2017-06-29T03:40:41+5:302017-06-29T03:40:41+5:30
पीएमपीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चलाखीने कटर आणि नखांचा वापर करून महिला व पुरुषांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला

प्रवाशांना लुटणारी टोळी जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चलाखीने कटर आणि नखांचा वापर करून महिला व पुरुषांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंढवा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून एकूण २१० ग्रॅम वजनाचे ६ लाख २९ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
टोळीचा मुख्य सूत्रधार सचिन ऊर्फ गुरू ऊर्फ दरवेश तंगाई तेवर ( वय ३२ वर्षे, रा. मंगतराम पेट्रोलपंप काजू टेकडी, गणेशनगर, मुंबई), प्रशांत ऊर्फ परश्या अनिल पवार (वय २७ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मल्लमा निवास, मुंढवा) आणि संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय २८ वर्षे, सर्वोदय कॉलनी माजी सैनिक, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींवर मुंढवा पोलीस ठाण्यात ३, विमानतळ ३, चंदननगर १, हडपसर ५, येरवडा २, कोंढवा १, बंडगार्डन १ असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील करीत आहेत.
या कामगिरीमध्ये पोलीस हवालदार सुरेश सोनावणे, कैलास चव्हाण, नीलेश गायकवाड, नीलेश जगताप, सचिन कोकरे, दतात्रय विभुते, श्याम शिंदे, संदेश काकडे, गजेंद्र चिंतनगिरे यांचा समावेश होता.