शहराची वाहतूक समस्या ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 02:15 IST2016-06-23T02:15:22+5:302016-06-23T02:15:22+5:30
शहरात कोठेही वाहन पार्किंग करा किंवा रस्त्याच्या मधोमध वाहने उभे करून गप्पा मारा... रस्त्याच्या मधोमध हातगाडे उभे करून व्यवसाय करा... त्यासाठी वाहनचालकाला कितीही मनस्ताप झाला तरी फिकीर नाही.

शहराची वाहतूक समस्या ‘जैसे थे’
बारामती : शहरात कोठेही वाहन पार्किंग करा किंवा रस्त्याच्या मधोमध वाहने उभे करून गप्पा मारा... रस्त्याच्या मधोमध हातगाडे उभे करून व्यवसाय करा... त्यासाठी वाहनचालकाला कितीही मनस्ताप झाला तरी फिकीर नाही... ही अवस्था आहे बारामती शहरातील अंतर्गत वाहतुकीची. काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या वाहतूक नियंत्रक समितीने शोधलेल्या उपायांना नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे हरताळ फासला गेला आहे.
प्रत्येक वेळी शहरातील वाहतूकसमस्येचा प्रश्न समोर आला की त्यावर शहर पोलीस ठाणे, नगरपालिका, व्यापारी यांच्या बैठका बसतात. चहा-पाणी होऊन निर्णय घेतले जातात. या निर्णयांची परिपत्रकेदेखील काढली जातात. मात्र, बैठकीवरून उठताच निर्णयांच्या परिपत्रकांना केराची टोपली दाखवली जाते. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक व पार्किंगच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली गेली.
या बैठकीत शहरांतर्गत वाहतूकसमस्येवर उपाय शोधण्यासाठी वाहतूक नियंत्रक समिती नेमली गेली. यानंतरही शहरातील वाहतूकसमस्या ‘जैसे थे’ आहे.
शहरातील इंदापूर चौक, भिगवण चौक, पंचायत समिती चौक, गुणवडी चौक, छत्रपती शिवजीमहाराज रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर, तीन हत्ती चौक आदी भागांध्ये वाहतूककोंडी नित्याची बाब ठरली आहे. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. सकाळी १० च्या दरम्यान व सायंकाळी ५ च्या दरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होते.
शाळा परिसरात देखील गर्दीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
शहरातील गुणवडी चौक, छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर फेरीवाले व्यवसाय करीत असतात. मागील आठवड्यात शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रस्त्याच्या मधे हातगाडे लावणाऱ्या फेरीवाल्यांना समज देण्यात आली होती. नगरपालिका या फेरीवाल्यांकडून कर पावत्यादेखील घेते.
मात्र, अनेक वेळा नगरपालिकेच्या मासिक बैठकांमध्ये चर्चा होऊनदेखील हॉकर्स झोनच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही.