चाकणला वाहतुकीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:50 IST2017-07-28T05:50:14+5:302017-07-28T05:50:18+5:30
पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील चाकण शहरातील सर्वच प्रमुख चौकांत अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांमुळे चाकणच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

चाकणला वाहतुकीचे तीनतेरा
चाकण : पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील चाकण शहरातील सर्वच प्रमुख चौकांत अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांमुळे चाकणच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. या महामार्गावरील आंबेठाण, राजगुरुनगर, भोसरी, तळेगाव, शिक्रापूर या प्रमुख रस्त्यांवर बेसुमार अवैध वाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्त उभी असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. असे अनेक चालक बिनधास्तपणे वाहने चालवीत आहेत. कित्येक वाहनांचे परवाना नूतनीकरण केलेले नाही. कित्येक वाहनांचा इन्शुरन्स नाही. बाहेरच्या जिल्ह्यातील पासिंगची वाहने या ठिकाणी बिनदिक्कत सुरू आहेत. आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत; परंतु कोणत्याही जखमीला वा मृतांच्या नातेवाइकांना भरपाई मिळाली नाही. परंतु, आजही ही वाहने रस्त्यावरून धावत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण, राजगुरुनगर, भोसरी, तळेगाव व शिक्रापूर या चौकांतील मुख्य रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनांची संख्या हजार ते पंधराशे इतकी मोठी आहे. यामध्ये तीन चाकी पियाजो रिक्षा, जीप, टाटा मॅजिक, सहा आसनी रिक्षा, इक्को अशा अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरली जातात. रिक्षामध्ये १० ते १५ प्रवासी भरतात व जीपमध्ये १५ ते २० प्रवासी भरले जातात. निव्वळ पैसे कमवायचे, या उद्देशाने ही बेकायदा प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी व स्थानिक पोलीस प्रशासन काहाही कारवाई करीत नाहीत. प्रत्येक वाहनामागे १५०० ते २००० रुपये हप्ता महिन्याला गोळा केला जातो. हे हप्ते गोळा करण्यासाठी ठराविक पंटरची नेमणूक करण्यात आली आहे. हे खासगी पंटर वाहनचालकांकडून दर महिन्याला हप्ता गोळा करतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.
हप्ते द्या अन् अवैध प्रवासी वाहतूक करा! या उद्देशाने ही वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त लावा, चौकात गर्दीच्या ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी वाहने कुठेही उभी करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जणू हमीच पोलिसांनी दिलीय की काय? हप्ता दिला, की रस्त्याचे मालक झालात. वाहनचालकांना कोणी काही म्हटले तर तेच, ‘आम्ही काही फुकट वाहन चालवत नाही, पोलिसांना हप्ते देतो. राजकीय कार्यक्रमासाठी व नेत्यांना देणग्या देतो; त्यामुळे आमची वाहतूक बंद केली जात नाही,’ असे सांगतात. त्यामुळे या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जात नाही. कारवाई केली तर ती तात्पुरत्या स्वरूपाची असते किंवा कारवाईचा निव्वळ फार्स केला जातो. यावर लवकर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीकरिता खासगी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक प्रत्येक चौकात केली आहे. या ट्रॅफिक वॉर्डनला रोजंदारीवर पगार दिला जातो; परंतु बहुतेक चौकांमध्ये वाहतूक पोलीस वाहनकोंडी सुरळीत करताना खूप कमी दिसतात. मात्र, ट्रॅफिक वॉर्डनच हे काम करताना दिसत आहेत. चाकण शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाची घोषणा होऊन निधीची तरतूद केली असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र, अजूनही याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने नक्की उड्डाणपूल होणार का? असा प्रश्न चाकणकरांना पडला आहे. औद्योगिक वसाहतीत मोठी वाढ झाल्याने चाकणच्या पंचक्रोशीत नागरीकरणही त्याच पटीत वाढले आहे. कंपनीत कामासाठी जाणाºया कामगारांना कंपनीकडून बससेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंरतु, ही बससेवा खासगी ठेकेदारांकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असून, कुठेही बस उभ्या करण्यात येत असल्याने जीवघेणे अपघातात घडले आहेत.औद्योगिक भागात कामाला जाणाºया महिला जास्त प्रमाणात आहेत. या महिला कामगार तसेच शाळा-महाविद्यालयांत जाणाºया मुलींना असल्या वाहनातून प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.