- सचिन ठाकरपवनानगर : लोणावळ्याजवळील दुधिवरे खिंडीच्या दोन्ही बाजू ठिसूळ झाल्या आहेत. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. तसेच खिंडीतून जाणारा पवनानगर-लोणावळा रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
मावळ तालुक्यातील पवनमावळ हा परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे. पंरतु रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. पवनानगर ते लोणावळा रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत जोराचा पाऊस झाल्यास मोठमोठे दगड रस्त्यावर येतात. आठवडाभरापूर्वी मोठे दगड खिंडीत आल्याच्या घटना घडल्या होत्या. खिंडीतून ये-जा करणाऱ्या परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, दुग्ध व्यवसायिक व पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच पवनमावळ परिसरात रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर झाल्याचे चित्र आहे.
दुधिवरे खिंडीत रात्री अपरात्री केव्हाही मोठ मोठे दगड, झाडे रस्त्यावर येतात. मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येणार आहे का? -अतुल लक्ष्मण कालेकर, सामाजिक कार्यकर्ते
दुधिवरे खिंडीच्या दोन्ही बाजू उंच असल्याने संपूर्ण खिंड ठिसूळ झाली आहे. गेल्याच आठवड्यात खिंडीलगतचा मातीचा काही भाग रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. स्थानिकांच्या मदतीने रस्ता खुला केला. प्रत्येक वेळी हिच समस्या निर्माण होत असते. पंरतु प्रशासनाचे दुर्लक्ष होते. - सागर धानिवले, स्थानिक नागरिक
शनिवारी व रविवारी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दुधिवरे खिंडीतून जाणारा पवनानगर-लोणावळा रस्ता अरुंद आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. शिवाय, वाहतूक कोंडी व वादाचे प्रसंगही घडतात. - संतोष मोरे, स्थानिक नागरिक
पवन मावळातील शालेय विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक व नोकरदारांची दुधिवरे खिंडीत वर्दळ असते. परंतु ही खिंड धोकादायक असल्याने जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. बांधकाम विभागाने येथे त्वरित उपाययोजना कराव्यात. - अनिल साबळे, स्थानिक नागरिक
दुधिवरे खिंडीमध्ये जाळी बसविण्याचे काम मंजूर झाले आहे. पाऊस उघडल्यावर ते काम चालू होणार आहे. - बी. एस. दराडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वडगाव मावळ
Web Summary : Dudhivare pass near Lonavala faces increased accident risk due to unstable slopes and narrow, potholed roads. Locals urge immediate action from the Public Works Department to prevent accidents and ease traffic congestion, especially with increased tourist activity.
Web Summary : लोनावला के पास दुधिवरे दर्रे में अस्थिर ढलानों और संकरी, गड्ढों वाली सड़कों के कारण दुर्घटना का खतरा बढ़ गया है। स्थानीय लोगों ने दुर्घटनाओं को रोकने और यातायात की भीड़ को कम करने के लिए लोक निर्माण विभाग से तत्काल कार्रवाई करने का आग्रह किया है, खासकर पर्यटकों की बढ़ती गतिविधि के साथ।