पारंपरिक पद्धतीने होळीची तयारी
By Admin | Updated: March 12, 2017 03:30 IST2017-03-12T03:30:47+5:302017-03-12T03:30:47+5:30
पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी झाली आहे. गोवऱ्या, टिमक्या तसेच पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली

पारंपरिक पद्धतीने होळीची तयारी
पुणे : पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी झाली आहे. गोवऱ्या, टिमक्या तसेच पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती. चिमुकल्यांसाठीच्या आकर्षक पिचकाऱ्या, नैसर्गिक आणि रासायनिक रंग, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पांढरे सदरे व कुर्ते अशा होळीसाठीच्या साहित्याने बाजारपेठेत ठाण मांडले आहे. या साहित्याची खरेदी करण्यासाठी चिमुकल्यांसह तरुणाईची झुंबड उडत आहे.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असते. या उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटवणे. होळी म्हणजे सर्वांना गारठून टाकणाऱ्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे वसंत ॠतूचे स्वागत केले जाते.
होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या सायंकाळी देवळासमोर किंवा आजकाल इमारतींमध्ये होळी पेटवली जाते. त्यामध्ये एरंड, माड पोफळी आणि उसाचा वापर केला जातो. त्याभोवती गोवऱ्या व लाकडे रचून ‘होलिकायै नम:’ हा मंत्र म्हणून होळी पेटवली जाते. होळीत भाजल्या गेलेल्या नारळाचा प्रसाद म्हणून वाटप केले जाते.
जडवाद आणि भोगवाद यांना जाळून, त्यांची धुळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या अपप्रवृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावानं ‘शिमगा’ करत सद्वृत्तींचा जयघोष करायचा, हा होळी सणामागचा हेतू आहे.
वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनदिनी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
(प्रतिनिधी)
वाढतेय गोवऱ्यांची मागणी
होळीच्या जळणासाठी वापरात येणाऱ्या गोवऱ्यांची मागणी वाढली असून गोवऱ्या विकत घेण्यासाठी अनेकांची पावले मंडर्ईकडे वळण्यास सुरुवात झाली आहे. होळीमध्ये गोवऱ्या या प्रामुख्याने वापरल्या जाताता. सध्या पाचशे रुपयांमध्ये शंभर गोवऱ्या मिळत असून खानापूर, नसरापूर या भागांमधून गोवऱ्या मंडईमध्ये दाखल झाल्या आहेत.
परदेशातही गोवऱ्यांना मागणी असून अमेरिका, दुबई अशा देशांमध्येही त्या निर्यात करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आता आॅनलाईनही गोवऱ्या विकण्यास उपलब्ध झाल्या आहेत. या माध्यमातून थेट घरपोच त्या मिळत असल्याने या माध्यमातूनही त्या खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे. मंडईमध्ये गोवऱ्या विकणारे राजू जगताप म्हणाले, ‘‘गेली ८ ते १० वर्षे मी गोवऱ्या विकत आहे. खानापूर, नसरापूर अशा ठिकाणांहून मी या गोवऱ्या विक्रीस आणतो. होळीच्या सणासाठी सात ते आठ हजार गोवऱ्या विकल्या जातात. होळीच्यानिमित्ताने गोवऱ्यांची विक्री वाढली असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होताना दिसत आहे. गाय दूध देणे बंद केल्यास गवळी गार्इंना कत्तलखान्यात विकत होते. मात्र गाई-म्हशींकडून शेणाच्या रूपाने उत्पन्नाचा स्रोत शिल्लक आहे, हे लक्षात आल्यावर गार्इंना विकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गोवऱ्यांचा वापर केल्याने प्रदूषण रोखण्यास मदत होत असल्याने होळीत त्यांचा वापर वाढताना दिसून येत आहे.