आदिवासी भागात पारंपरिक गुढीपाडवा
By Admin | Updated: March 29, 2017 00:12 IST2017-03-29T00:12:41+5:302017-03-29T00:12:41+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गुढीपाडवा हा सण आदिवासी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला

आदिवासी भागात पारंपरिक गुढीपाडवा
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गुढीपाडवा हा सण आदिवासी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदू मराठी नववर्ष व या शुभ मुहूर्तावर साजरा करण्यात येणारा गुढीपाडव्याचा सण आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सर्वप्रथम या परिसरामध्ये असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील मंदिराच्यापुढे उपस्थित ब्रह्मवृंदांसमवेत वेदपठणाद्धारे गुढी उभारली जाते.
यानंतर राम मंदिर, कमलजादेवी मंदिरासमोरही देवाच्या मानाच्या गुढ्या उभारल्या जातात. या गुढ्या उभारण्यासाठी आदिवासी भागातील आदिवासीबांधव मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देवाची गुढी उभारल्यानंतरच या परिसरातील आदिवासीबांधव आपापल्या गावात जाऊन आपल्या ग्रामदैवतेच्या मंदिरासमोरील गुढी उभारली जाते. विशेषत: भीमाशंकर मंदिराच्या पुढील म्हणजेच देवाची गुढी उभारल्याशिवाय या परिसरातील गुढ्या उभारल्या जात नाहीत.
ही वर्षानुवर्षे चाललेली रुढी, परंपरा आजही चालू आहे. यानंतर शानदार पद्धतीने गुढ्या उभारल्या जातात. आदिवासी भागामध्ये गुढी उभारण्याचा मान घरातील कुटुंबप्रमुखास दिला जातो. मेस या वृक्षाची काठी काढून या काठीला शानदार पद्धतीत सजविण्यात येते. या काठीच्या टोकाला नवीन वस्त्र लावून कडुलिंबाची पाने साखरेपासून बनविण्यात येणारी गाठी व फुलाची माळ घालून ही गुढी उभारण्यात येते. भीमाशंकर मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या या गुढीला ‘देवाची गुढी’ असे म्हणतात. मोठ्या आदरभावाने उभारण्यात आलेल्या या गुढीला पुरणपोळी त्याचप्रमाणे साखरेपासून बनविण्यात येणाऱ्या गाठीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
यानंतर या गुढ्या दिवसभर उभारून संध्याकाळी सूर्यास्तानंतर उतरविण्यात आल्या. आदिवासी भागातील मुलांनी ढोल, ताशा व विविध सोंगे करून या गुढ्या उतरविण्यात आल्या. या परिसरातील सर्व मुले एकत्र येऊन प्रथमत: देवाच्या गुढीला गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून देवाची गुढी उतरविण्यात आली. त्यानंतर गावामध्ये जाऊन प्रत्येक घरासमोरील गुढ्या उतरविण्यात आल्या. गुढ्या उतरवित असताना प्रत्येक घराघरांतून गूळ खोबरे जमा करून मोठ्या प्रमाणात चूर्ण तयार केले जाते व मोठ्या मानाने गावात प्रसाद म्हणून वाटले जाते. मोठ्या मानाने आदिवासीबांधव हा प्रसाद सेवन करतात.(वार्ताहर)