पोलिसांना जुमानेनात व्यापारी
By Admin | Updated: September 25, 2014 06:20 IST2014-09-25T06:20:52+5:302014-09-25T06:20:52+5:30
बेशिस्त वाहनचालकांना हटकले, तर लगेच वाहतूक नियोजनाची शिस्त लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जमावाने गराडा घातला जातो

पोलिसांना जुमानेनात व्यापारी
पिंपरी : बेशिस्त वाहनचालकांना हटकले, तर लगेच वाहतूक नियोजनाची शिस्त लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जमावाने गराडा घातला जातो. कारवाईला न जुमानता मोर्चा, आंदोलने करून पोलीस कर्मचाऱ्याला अडचणीत आणण्याची भाषा केली जाते. वरिष्ठांकडे
तक्रार देऊ, असा दबाव तंत्राचा अवलंब केला जातो. अशा परिस्थितीत अधिकार असूनही पोलिसांना काम करता येत नाही. त्यामुळे पिंपरी आणि कॅम्प भागातील वाहतूक प्रश्न जटिल बनला आहे.
येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटावा, असे नागरिकांना वाटते. वाहतूक पोलीससुद्धा त्यावर उपाययोजना करतात. या मार्गाने ये- जा करणाऱ्या नागरिकांना या उपाययोजनांंतर्गत केलेले बदल मान्य असतात. परंतु या परिसरात ज्यांची दुकाने आहेत, त्यांपैकी अनेक व्यापाऱ्यांना या उपाययोजना नको वाटतात. वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे केले जाणारे व्यवस्थापन अडचणीचे वाटत असल्याने अशा व्यापाऱ्यांकडून वाहतूक पोलिसांना त्रासदायक वागणूक दिली जाते. काही व्यापारी तर दंडेलशाही करतात. वाहतूक व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या जातात. अशा परिस्थितीत पिंपरीतील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यात पोलीस अपयशी ठरू लागले आहेत.
वाहतूक व्यवस्थापनाची शिस्त लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी एकी दाखवली जाते. त्यांच्या अशा दबावतंत्राच्या कारवायांमुळे पोलीस कर्मचारी हतबल झाले आहेत.
किरकोळ विक्रेत्यांपासून ठोक व्यापाऱ्यापर्यंत छोटी-मोठी शेकडो दुकाने कॅम्पात आहेत. राजीव गांधी पुलाकडून साई चौकाकडे जाणारा रस्ता, शगुन चौकाकडून डिलक्स चौकाकडे जाणारा रस्ता यासह रिव्हर रोड आणि मेन रोड या परिसरात अधिकाधिक दुकाने आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील अनेकजण या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्यामुळे पिंपरी बाजारपेठेत नेहमीच गर्दी असते. सुटीच्या दिवशी गर्दीत अधिकच वाढ होते. अशा वेळी योग्यरित्या वाहतूक व्यवस्थापन न केल्यास वाहतूककोंडी होते.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून नेहमीच कारवाईची मोहीम राबविली जाते. पार्किंगच्या बाहेर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे कॅम्पातील वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र, बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना काही व्यापाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे कॅम्पात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक नियमन व्यवस्थित केले जात नाही, अशा तक्रारी काही व्यापाऱ्यांकडून नियंत्रण कक्षाला कळविल्या जातात. त्यामुळे वाहतूक कर्मचाऱ्यांपुढेच प्रश्न उभा राहतो.
रविवारी रात्री शगुन चौकात ‘पार्किंग’च्या बाहेर रस्त्यातच उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना शगुन चौकातील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. कारवाई केल्यास रस्त्यावर उतरु अशी दमबाजीची भाषा केल्याने पोलीस व व्यापारी यांच्यात वाद झाला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होता. तसेच गणपती विसर्जनादिवशी एकेरी वाहतुकीमुळे रस्ता बंद असतानाही त्या रस्त्याने वाहन सोडण्याचा आग्रह एका माजी उपमहापौराने धरला. पोलिसांनी वाहन सोडण्यास नकार दिल्याने माजी उपमहापौर व त्यांचे समर्थकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)