जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आजपासून खुली होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:43+5:302021-01-08T04:32:43+5:30
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीमध्ये गर्दी टाळण्याच्या उद्देशातून जवळपास दहा महिने बंद असलेली राज्यातील प्रेक्षणीय स्थळे बुधवारपासून ...

जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आजपासून खुली होणार
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीमध्ये गर्दी टाळण्याच्या उद्देशातून जवळपास दहा महिने बंद असलेली राज्यातील प्रेक्षणीय स्थळे बुधवारपासून (दि. ६) खुली होणार असून, प्रेक्षणीय स्थळांमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परवानगी दिली आहे.
राज्यातील प्रेक्षणीय स्थळे १६ मार्चपासून बंद ठेवली होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, टाळेबंदी शिथिल केली. अजंठा आणि वेरुळ लेणी यांसारखी प्रेक्षणीय स्थळे सुरू झाली. मात्र, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस यांसह पुणे जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी बंदच होती. प्रेक्षणीय स्थळे सुरू करण्यासाठी परवानगी देताना पुरातत्व विभागाने संबंधित जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ही स्थळे पर्यटकांसाठी खुली करावीत, असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रेक्षणीय स्थळे सुरू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची प्रत मिळाली असल्याने बुधवारपासून जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे खुली होत आहेत, अशी माहिती पुरातत्व विभागाचे पुणे येथील संरक्षण सहायक गजानन मंडावरे यांनी दिली.
प्रेक्षणीय स्थळांमध्ये १५ वर्षांखालील मुला-मुलींना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता शासकीय नियमांनुसार दहा वर्षांखालील मुला-मुलींना, तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देता येणार नाही. त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीट विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन तिकीट खरेदीमध्ये सवलत दिली आहे, असे मंडावरे यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे
- शनिवारवाडा
- आगाखान पॅलेस
- कार्ला लेणी
- भाजे लेणी
- भेडसे लेणी
- लोहगड किल्ला
- विसापूर किल्ला
- शिवनेरी किल्ला
- लेण्याद्री लेणी