उन्हाच्या काहिलीने टोमॅटोची रोपे कोलमडली
By Admin | Updated: March 29, 2017 00:22 IST2017-03-29T00:22:20+5:302017-03-29T00:22:20+5:30
चालू वर्षी असणाऱ्या तीव्र उन्हाळ्याची झळ माणसांना तर बसत आहेच, पण टोमॅटोच्या नवीन लागवडी केलेल्या नवीन

उन्हाच्या काहिलीने टोमॅटोची रोपे कोलमडली
खोडद : चालू वर्षी असणाऱ्या तीव्र उन्हाळ्याची झळ माणसांना तर बसत आहेच, पण टोमॅटोच्या नवीन लागवडी केलेल्या नवीन रोपांवरदेखील दुष्परिणाम होत आहे. शेतात लागवड केलेली रोपे सुकू लागली आहेत. ती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चालू वर्षी टोमॅटोला बाजारभाव चांगले मिळतील, या आशेने टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. इतर कोणत्याही शेतीमालाला खात्रीशीर बाजारभाव राहिला नसल्याने आर्थिक चलन फिरविण्यासाठी टोमॅटोच्या पिकाशिवाय पर्याय नाही, असा विचार करून अनेक छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
टोमॅटोपिकासाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच बसवून शेतकरी टोमॅटोची लागवड करीत आहेत. वाढत्या उन्हामुळे या नवीन रोपांना उष्णतेच्या तीव्र झळा लागल्यामुळे रोपे कोलमडून जाऊन सुकू लागली आहेत.
नर्सरीमधून थेट शेतात लागवडीसाठी आणलेली टोमॅटोची रोपे वाढत्या उष्णतेला तग धरून राहू शकत नाहीत. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे टोमॅटोची रोपे सुकून मर वाढण्याची शक्यता असते.
‘वाढत्या उष्णतेने टोमॅटो रोपांचा बाष्पोच्छर्जनाचा वेग वाढतो आणि रोपे कोलमडतात, यामुळे रोपांची लागवड शक्यतो संध्याकाळी करावी. दोन दिवस अगोदर बेड चांगले भिजवून घ्यावेत. त्यामुळे मातीतील उष्णता निघून जाते. मल्चिंग पेपरला छिद्र पाडल्यानंतर लगेच लागवड करू नये. १ दिवस मल्चिंग पेपरमधील उष्णता हवेत निघून जाऊन द्यावी. त्यामुळे रोपांची होणारी मरतुक कमी होते.’ असे कृषी तंत्रनिकेतन केंद्राचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.
(वार्ताहर)
रोपे वाचविण्यासाठी काय करता येईल?
शक्य असेल तर आय. व्ही. क्रॉप कव्हरच वापर करावा. त्यामुळे पिकांचा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव होतो. शेताच्या चहू बाजूंनी मका, हत्ती गवताची लागवड करावी.
हिरव्या शेडनेटचा वापर करावा. त्यामुळे पिकाला उष्णतेचा जास्त त्रास होत नाही. रोपे लागवडीपूर्वी व्यवस्थित हार्डनिंग केलेली असावीत. शेडनेटमधून आणून थेट शेतात लागवड करू नये. त्यामुळे रोपांची मर वाढते.