पुणे-नाशिक महामार्ग पूर्ण होईपर्यंत चाळकवाडीत टोलनाका सुरू करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST2021-04-01T04:13:00+5:302021-04-01T04:13:00+5:30
नारायणगाव : स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध व आंदोलन केल्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला ...

पुणे-नाशिक महामार्ग पूर्ण होईपर्यंत चाळकवाडीत टोलनाका सुरू करू नये
नारायणगाव : स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध व आंदोलन केल्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला होता. मात्र कामे अर्धवट असताना पुन्हा एकदा हा टोलनाका सुरू केला जात आहे. जोपर्यंत पुणे-नाशिक महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत चाळकवाडीचा टोल नाका सुरू करु नये, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया) मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह आणि प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
टोलनाक्याच्या मुद्द्यावर खा.डॉ. कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक महामार्गावरील बहुतेक ठिकाणी बाह्यवळण रस्ते आणि अन्य कामे अर्धवट असताना टोलवसुली केली जात होती. अखेर स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवीत तीव्र आंदोलन केल्यानंतर चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला होता. दरम्यान, नारायणगाव आणि खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार बाह्यवळण रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांनी जोपर्यंत महामार्गावरील काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत जुन्नर येथील चाळकवाडी टोलनाका उभारणीला जोरदार विरोध दर्शविला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उद्यापासून (दि. १) चाळकवाडी येथील टोलनाका पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात येणार आहे.