सेवा रस्त्यासाठी टोल बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:04+5:302021-06-22T04:09:04+5:30
बाभुळगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बाह्यवळण मार्गावर सेवा रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना शेती, पिके व दळणवळणासाठी मोठ्या ...

सेवा रस्त्यासाठी टोल बंद
बाभुळगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बाह्यवळण मार्गावर सेवा रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना शेती, पिके व दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्याबाबत टोल प्रशासन संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील योग्य न्याय मिळत नसल्याने सोमवारी (दि. २१) बाधीत शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले. सरडेवाडी टोल नाका बंद करत अर्धा तास पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरला. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक यांनी हस्तांतरित केलेल्या इंदापूर बाह्यवळण महामार्गावरील बेडशिंगे रोड ते पायल सर्कल या भागातील सव्वा कि.मी.अंतर लांबीचा सेवा रस्ता महामार्ग निर्मितीवेळी जाणीवपूर्वक बांधण्याचे टाळल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतीतील पिके, ऊस व मालवाहतूक करणे अवघड जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग संबंधित विभागाकडे मागील सहा ते सात वर्षांपासून तक्रारी देऊनसुद्धा न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाड्या व गुराढोरांसह रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्रकल्प संचालक, पुणे यांना इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक पोपट शिंदे व शेकडो शेतकऱ्यांनी सह्या करून मागील सात वर्षांत अनेक वेळा निवेदन दिले. खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे दोन वेळा पत्र जोडून राजमार्ग प्राधिकरणास पाठपुरावा केला. तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने इंदापूर शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकारी यांना आत्मदहनाचे निवेदन देऊन टोल बंद केला.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये जुन्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडत असल्याने शेतकऱ्यांना रहदारी करताना वाहने रस्त्यात अडकून शेतपिकांचे नुकसान होत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग संबंधित प्राधिकरण अधिकारी वारंवार आश्वासनाव्यतिरिक्त कसलीही कारवाई करत नसल्याने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. त्यामुळेच शेतकरी संतप्त झाल्याने रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी सरडेवाडी टोल नाक्यासमोरील महामार्ग रस्ता अर्धा तास रोखून धरला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असून, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा कडक आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनाचे प्रमुख नगरसेवक पोपट शिंदे यांच्याशी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आंदोलनस्थळी संवाद साधला व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या वेळी आंदोलकांनी स्पष्ट विरोध केला. त्यानंतर तहसीलदार यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चिटणीस यांना इंदापूर तहसील कार्यालयात आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
पोपट शिंदे म्हणाले की, सेवा रस्ता करण्याबाबत आम्ही मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. आमच्या एकाही अर्जाची अद्यापपर्यंत टोल प्रशासनाने दखल घेतलेली नाही. अगर कोणत्याही अधिकाऱ्याने घटनास्थळावर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली नाही. या ठिकाणी सेवा रस्ता नसल्यामुळे आम्हांला शेतमाल वाहून नेणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे आमचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच ऊस रस्त्यावर वर चढवताना अपघात होऊन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. याला टोल प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप पोपट शिंदे यांनी केला.
____________________________________________
चौकट : दोनच दिवसांत रस्त्याचा प्रस्ताव देणार असल्याचे प्राधिकरणाकडून मान्य
आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणीस यांनी आंदोलकांची इंदापूर तहसील कार्यालयात भेट घेतली. दोनच दिवसांत कच्चा रस्ता करून प्रस्ताव दिल्ली, मुंबई व पुणे ऑफिसला पाठवणार असून, त्याची एक प्रत शेतकरी व तहसीलदार यांना पाठवणार आहे. तसेच लवकरच सर्व्हिस रोड तयार करून देणार असल्याचे सांगितले.
चौकट
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनेक बैलगाड्या सरडेवाडी टोल नाक्यावर आणल्या होत्या. बैलगाड्यांनी टोल नाका बंद करण्यात आला होता. आंदोलनात शेतकरी महिला, लहान मुले, अनेक शेतकरी कुटुंबे व तरुण सहभागी झाले होते. यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शेकडो पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी आंदोलकांनी टोल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
फोटो ओळी.. राष्ट्रीय महामार्ग सरडेवाडी येथे शेतकऱ्यांनी सर्व्हिस
रोडच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.