टोल भरूनही मरण ‘स्वस्त’

By Admin | Updated: January 25, 2017 01:53 IST2017-01-25T01:53:58+5:302017-01-25T01:53:58+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा दिवसेंदिवस असुरक्षित प्रवासाचा एक्सप्रेस महामार्ग बनला असल्याने या मार्गावरून प्रवास करताना

Toll dies due to toll | टोल भरूनही मरण ‘स्वस्त’

टोल भरूनही मरण ‘स्वस्त’

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा दिवसेंदिवस असुरक्षित प्रवासाचा एक्सप्रेस महामार्ग बनला असल्याने या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. कोणती गाडी कोठून येईल व अपघात होईल याचा या मार्गावर नेम नसल्याने द्रुतगती महामार्गावर टोल देऊन असुरक्षित प्रवास करावा लागत आहे.
मागील १५ वर्षांपासून या मार्गावर हजारो अपघात झाले. यामध्ये कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मात्र हे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन असो वा या मार्गावर देखभाल दुरुस्ती पाहणारी आयआरबी कंपनी असो यांनी कसलीही ठोस पावले उचलली नसल्याने आज हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मार्गावर सुरूअसलेल्या याच मृत्यूच्या व अपघातांच्या तांडवाने सिंधूताई सपकाळ यांचा राग अनावर झाला होता.
कळंबोली ते किवळे असा ९१ किमी अंतराचा भारतातील हा पहिला द्रुतगती महामार्ग बनविण्यात आला. मात्र तो बनवितानाच काही मालमत्ता वाचविण्याच्या नादात लोणावळा, सिंहगड कॉलेज ते खोपोली फुडमॉलपर्यंत या मार्गाचा मूळ प्रस्ताव बाजूला ठेवत उड्डाणपूल व वेड्यावाकड्या वळणाचा तो बनविण्यात आल्याने व या मार्गावर घाटातील चढण तसेच उतार कायम ठेवण्यात आल्याने द्रुतगती मार्ग या संकल्पनेलाच छेद दिला गेला. या मार्गावर लेनच्या शिस्तीचे सर्रास उल्लंघन करत कोणतेही वाहन लेनमधून वेगमर्यादेच्या कित्येकपट जादा वेगाने पळवली जात असल्याने अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, यावर कोणाचेही नियंत्रण नाही उलट द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचा अहवाल देत सुरक्षा यंत्रणांनी हात वर केले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, याच्या खोलात कोणी जात नसल्याने १५ वर्षांनंतर आज हा मार्ग खरेच सुरक्षित आहे का, यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी ही वायर लावण्यात आली असली, तरी अजून अनेक ठिकाणे ही धोकादायक असून, तेथे ही वायर लावण्यात आलेली नाही. मार्गावर कोठेही पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. मावळ परिसरातून हा मार्ग गेला आहे, मार्गालगतच्या गावांना साधा सर्व्हिस रोडदेखील १५ वर्षांत देण्यात न आल्याने मार्गालगतच्या गावातील नागरिक जीव धोक्यात घालत सर्रासपणे दुचाकी वाहने घेऊन या मार्गावर येत आहेत याला नेमके जबाबदार कोण असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक आवाहन करत हे अपघात रोखण्यासाठी काही तर कर बाबा असे सांगितले. या आव्हानाला तरी महाराष्ट्र शासन प्रतिसाद देऊन या मार्गावरील रखडलेल्या सुविधा पूर्ण करत एक्सप्रेस वेच्या सुरक्षित प्रवासाला कटिबद्ध राहून सुरक्षा उपाययोजना करणार का? हा मृत्यूचा खेळ थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासन काय पावले उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Toll dies due to toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.