सर्व्हिस रोडसाठी टोल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:17+5:302021-06-22T04:09:17+5:30

बाभूळगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बाह्यवळण मार्गावर सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) नसल्याने शेतकऱ्यांना शेती, पिके व दळणवळणासाठी मोठ्या ...

Toll closed for service road | सर्व्हिस रोडसाठी टोल बंद

सर्व्हिस रोडसाठी टोल बंद

बाभूळगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बाह्यवळण मार्गावर सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) नसल्याने शेतकऱ्यांना शेती, पिके व दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्याबाबत टोल प्रशासन संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने सोमवारी (दि. २१) बाधित शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले. सरडेवाडी टोलनाका बंद करत अर्धा तास पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक यांनी हस्तांतरित केलेल्या इंदापूर बाह्यवळण महामार्गावरील बेडशिंगे रोड ते पायल सर्कल या भागातील सव्वा किलोमीटरचा सेवा रस्ता महामार्ग निर्मितीवेळी जाणीवपूर्वक बांधण्याचे टाळल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतीतील पिके, ऊस व मालवाहतूक करणे अवघड जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दर वर्षी पावसाळ्यामध्ये जुन्या रस्त्यात मोठे खड्डे पडत असल्याने शेतकऱ्यांची वाहने रस्त्यात अडकून शेतपिकांचे नुकसान होत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग संबंधित विभागाकडे मागील सहा ते सात वर्षांपासून तक्रारी देऊनसुद्धा न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बैलगाड्या व गुराढोरांसह रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्रकल्प संचालक, पुणे यांना इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक पोपट शिंदे व शेकडो शेतकऱ्यांनी सह्या करून मागील सात वर्षांत अनेक वेळा निवेदन दिले. खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे दोन वेळा पत्र जोडून राजमार्ग प्राधिकरणास पाठपुरावा केला तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने इंदापूर शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना आत्मदहनाचे निवेदन देऊन टोल बंद केला.

फोटो ओळी : राष्ट्रीय महामार्ग सरडेवाडी येथे शेतकर्‍यांनी सर्व्हिस

रोडच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Toll closed for service road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.