खेड, जुन्नर, आंबेगावच्या कारभारणींचा ‘लोकमत’तर्फे आज सत्कार
By Admin | Updated: March 10, 2017 04:52 IST2017-03-10T04:52:55+5:302017-03-10T04:52:55+5:30
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याच्या कारभारणी बनलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद

खेड, जुन्नर, आंबेगावच्या कारभारणींचा ‘लोकमत’तर्फे आज सत्कार
पुणे : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याच्या कारभारणी बनलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती महिला सदस्यांचा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे गौरव करण्यात येणार आहे.
हा सत्कार दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात शुक्रवारी खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील महिला सदस्यांचा तसेच आळंदी, जुन्नर, चाकण व राजगुरुनगर नगरपालिकेतील नगरसेविका अशा ७0 कारभारणींचा राजगुरुनगर
येथील पंचायत समिती सभागृहात
सायंकाळी साडेपाच वाजता गौरव सोहळा रंगणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत ७५ पैैकी ४0 व पंचायत समिती निवडणुकीत १५0 पैैकी ७१ अशा १११ महिला सदस्या विजयी झाल्या आहेत. सद्य:स्थितीत जुनेच सदस्य कारभार पाहात असून, १४ तारखेनंतर पंचायत समिती व २१ तारखेनंतर जिल्हा परिषद सदस्य सभागृहात प्रवेश करणार आहेत. लोकसेवेच्या वाटेवर पुढचे पाऊल टाकत असलेल्या या महिलांच्या पंखांत शुभेच्छांचे बळ भरण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनसेवेचे ब्रीद आणखी समर्थपणे पुढे नेता यावे, यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे ‘महिला सदस्यांचे अधिकार व कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकाही नुकत्याच झाल्या असून तेथील सभागृहातही महिला नगरसेविकांनी प्रवेश केला आहे. चाकण, आळंदी, राजगुरुनगर व जुन्नर नगरपालिकेतही सद्य:स्थितीत ४२ महिला नगरसेविका काम करीत आहेत. हे निमित्त साधून त्यांनाही सन्मानीत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयाची मागील जिल्हा परिषद निवडणुकीपासून (२०१२) अंमलबजावणी सुरू झाली.
या निर्णयाचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आहेत. सदस्या व नगरसेविका म्हणून महिलांचे पाणी, कचरा, आरोग्य आदी मूलभूत प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे त्या समजावून घेऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर गट, गणाच्या व प्रभागाच्या विकासामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
विकासाच्या परंपरेला नव्या कारभारणी पुढे घेऊन जाणार आहेत. त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याकरिता ‘लोकमत’च्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित महिला सदस्या व नगरसेवकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सत्काराचा स्वीकार करावा, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी म्हाळुंगे (इंगळे) येथील राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उज्वला वाळके व ग्रामपंचायत सदस्या कृतिका वाळके यांचा सहयोग लाभला आहे. (प्रतिनिधी)