आजचा दिवस उमेदवारांचा
By Admin | Updated: September 27, 2014 07:21 IST2014-09-27T07:21:14+5:302014-09-27T07:21:14+5:30
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून १४२ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरले

आजचा दिवस उमेदवारांचा
पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून १४२ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरले. बारामतीतून अजित पवार, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. शनिवारी (दि. २७) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.
जिल्ह्यात तब्बल २ हजार ८२३ अर्जांची विक्री झाली असून, २४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युती तुटल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. आज प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले.
वडगावशेरी मतदारसंघातून विद्यमान आमदार बापू पठारे, माजी आमदार चंद्र्रकांत छाजेड, मनसेचे नारायण गलांडे, कोथरूडमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे, भाजपच्या मेधा कुलकर्णी, कसब्यातून विद्यमान आमदार गिरीश बापट, काँग्रेसचे रोहित टिळक, पर्वतीतून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, काँग्रेसचे अभय छाजेड, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप व शिवलाल भोसले, पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे, दौंडमधून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे राहुल कुल, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार रमेश थोरात, भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शिवसेनेतर्फे कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदारे, शिरूरमधून राष्ट्रवादीच्या अशोक पवार आदींनी अर्ज भरला आहे. (प्रतिनिधी)