आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 12:20 PM2019-08-09T12:20:28+5:302019-08-09T12:21:59+5:30

शासकांकडून अन्याय झाल्यास त्यांच्याविरुद्ध महादेव कोळी समाजाने थेट बंडाचेदेखील निशाण फडकाविले होते.

Today is World Tribal Day: The tribal fight against oppressive rule | आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा

आज जागतिक आदिवासी दिन :जुलमी राजवटीच्या विरोधात आदिवासींचा लढा

googlenewsNext
ठळक मुद्देमुघल, पेशवाई, ब्रिटिशांच्या विरोधात केले बंड

नितीन ससाणे - 
जुन्नर : दुर्गम भागात राहणाऱ्या भातशेती करणाऱ्या कष्टकरी महादेव कोळी समाजाने शेतीबरोबरच मुघलकाळात, पेशवाईत, तसेच ब्रिटिशकाळात तत्कालीन शासकांच्या सैन्य दलात तसेच मुलकी सेवेत प्रामाणिकपणे कामे केली होती. परंतु, याच शासकांकडून अन्याय झाल्यास त्यांच्याविरुद्ध थेट बंडाचेदेखील निशाण फडकाविले होते. स्थानिक कोळ्यांनी केलेल्या या बंडाची माहिती  इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रा. लहू गायकवाड यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे ‘शिवनेरीची जीवनगाथा’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आणली आहे.
जुन्नर परिसर १६३६ च्या सुमारास मुघल राजवटीच्या अधिपत्याखाली आला. परिणामी स्थानिक कोळी समाज आणि मुघलांमध्ये संघर्ष सुरू झाला. १६५० मध्ये कोळी समाजाने त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले. मुघलांनी बंड केलेल्या कोळ्यांना पकडून शिवनेरीवर कैदेत टाकले. गडाच्या बालेकिल्ल्यावर त्यांना निर्दयीपणे ठार मारले. इतरांना कायमची दहशत बसावी व परत बंडाचा विचार करू नये, असा इशारा या नरसंहारातून देण्यात आला. कोळ्यांचा बंडाशी निगडित असणाऱ्या या ठिकाणावर चार बाजूला मध्यभागी चार कमानी असणाऱ्या चिरेबंदी दगडांच्या भिंतीवर तोललेला घुमट असलेली वास्तू आहे. याला कोळी चौथरा म्हणतात.


सन १७६४ मध्ये माधवराव पेशव्यांनी त्यांच्या प्रशासनात केलेल्या बदलाची परिणती शिवनेरी व पुरंदर किल्ल्यावर कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरी किल्ल्यावरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने याने १५ सप्टेंबर १७६४ रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड मोडण्यासाठी अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राने कळविली होती. कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानकपणे हल्ला करतात अशाच प्रकारचा हल्ला करून त्यांनी नाणेघाटाचा जवळील जीवधनचा किल्ला ताब्यात घेतला होता.  शिवनेरीवर उधो वीरेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी सन १७७५ मध्ये कोळ्यांनी शिवनेरी परिसरात दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व संताजी सीरकंदा याने केले. बंड मोडून काढण्यासाठी सवाई माधवरावाने व बारभाई मंडळाने वीरेश्वराच्या मदतीसाठी पुण्यातून गारदी पाठविले होते. वीरेश्वराने गारद्यांच्या मदतीने कोळ्यांचे बंड मोडून काढले. तर कोळी सरदारांना पकडून शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून गेला होता. पुढे संताजीने १७८१ मध्ये पुन्हा बंड केले. 
....
पहिल्या छायाचित्रात शिवनेरीच्या बालेकिल्ल्यावरील कोळी चौथरा. 
तर, दुसऱ्या छायाचित्रात दुसऱ्या बाजीरावाने शिवनेरीवरील बंडवाल्यांची चौकशी करून त्यांच्या घरांची व वतनाची, जमिनीची जप्ती करून सनद सादर करण्याच्या मोडी लिपीतील पत्राच्या सुरुवातीचा भाग. 
...........
ब्रिटिशकाळात इंग्रज अधिकाऱ्यांनी जुन्नर परिसरातील किल्ल्यांचा ताबा घेतला. ब्रिटिशांनी आदिवासी कोळ्यांच्या जीवनपद्धतीस अडथळे आणले. त्यांना कामावरून कमी केले. त्यांना चोर ठरविले म्हणून १८३९ मध्ये त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. बंडाचे नेतृत्व रामचंद्र गोरे, भाऊ खोरे, चिमणाजी जाधव यांनी केले. ब्रिटिशांनी रामचंद गोरे यांना पकडून फाशी दिले. तर, इतर ५४ लोकांना  आजन्म कारावासाची शिक्षा केली होती.  

सन १८०० ते १८०५ या काळात दुसऱ्या बाजीरावाने शिवनेरीवरील बंडवाल्यांची चौकशी करून त्यांच्या घराची व वतनाची, जमिनीची जप्ती करून सनद सादर करण्याचे मोडी लिपीतील पत्र उपलब्ध आहे.

Web Title: Today is World Tribal Day: The tribal fight against oppressive rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.