आजपासून पोलीस काठीला तेल लावून रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:35+5:302021-04-06T04:11:35+5:30
सायंकाळी ६ नंतर संचारबंदी : होणार कडक अंमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ...

आजपासून पोलीस काठीला तेल लावून रस्त्यावर
सायंकाळी ६ नंतर संचारबंदी : होणार कडक अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेले दोन दिवस संचारबंदीची अंमलबजावणी करताना पोलिसांनी जनजागृतीची भूमिका घेतली होती. मात्र, आता मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात आता मंगळवारपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ केली आहे. याबाबत डॉ. शिसवे यांनी सांगितले की, लोकांना या आदेशांची माहिती व्हावी, यासाठी गेले दोन दिवस पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला होता. पुणेकरांनीही या आदेशाला चांगला प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व आस्थापना दुकानदार स्वत:हून बंद करीत आहेत. कामावरुन घरी जाणाऱ्या कोणालाही अडविण्यात येत नव्हते. त्यांच्याकडे चौकशी करून उद्यापासून उशीर करू नये, अशा सूचना करण्यात येत होत्या.
गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी नागरिकांना संचारबंदीचे आवाहन केले. लोक कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, याची चौकशी केली. त्यात प्रामुख्याने बाहेरगावांहून आलेले प्रवासी, रुग्णालयातील रुग्णांसाठी डबा घेऊन जाणारे नातेवाईक, विमानतळ, रेल्वे स्थानकावर जाणारे व येणारे प्रवासी, तसेच डॉक्टरांकडे जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आढळून आले. वैध कारणे असलेल्यांना नाकाबंदीत चौकशी करुन सोडण्यात येत होते. विनाकारण बाहेर पडलेल्या काहींवर या दोन दिवसात कारवाई करण्यात आली.
चौकट
तर गुन्हे दाखल होणार
“शहरातील ९६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. महापालिकेने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना आता बाहेर पडण्याचे काम राहणार नाही. त्यामुळे सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येईल. जे कारणाशिवाय घराबाहेर पडलेले आढळतील त्यांच्यावर १८८ नुसार गुन्हे दाखल केले जातील.”
-डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त
चौकट
कारवाईची वेळ आणू नका
“कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्यक त्या उपाय योजना आखल्या असून पोलीस संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन कारवाईची वेळ आणू नये.”
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त
चौकट
साडेतेरा कोटी दंड वसुली
रविवारी (दि. ४) शहरात ८१४ जणांवर विनामास्क फिरल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे शहरात आतापर्यंत २ लाख ७७ हजार ९९० जणांवर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १३ कोटी ५२ लाख ८७ हजार ३०० रुपये दंड वसुली झाली.