मंडईत आज उधार, उद्या रोख

By Admin | Updated: November 14, 2016 07:01 IST2016-11-14T07:01:10+5:302016-11-14T07:01:10+5:30

चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजीपाला मंडईलाही फटका बसू लागला आहे. मार्केट यार्डातील

Today in the mandaiite lending, tomorrow cash | मंडईत आज उधार, उद्या रोख

मंडईत आज उधार, उद्या रोख

पुणे : चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजीपाला मंडईलाही फटका बसू लागला आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांसह किरकोळ मंडईतील विक्रेत्यांकडूनही आता भाजीपाला उधारीवर देण्यास सुरुवात झाली आहे. शेतमाल नाशवंत असल्याने विक्रीविना सडून जाण्यापेक्षा उधारीवर विकलेला बरा, असा भावना विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहेत.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाला विभागात रविवारी भाजीपाल्याची आवक तुलनेने कमी झाली. मात्र, ग्राहकांकडून मागणीही कमी असल्याने भाजीपाल्याचे भाव स्थिर राहिले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या किरकोळ विक्रेत्यांकडून माल खरेदी केल्यानंतर ५०० व एक हजारच्या नोटा पुढे केल्या जात असल्याने विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. काही व्यापाऱ्यांकडून या नोटा स्वीकारल्या जात असल्या तरी खरेदीदारांना देण्यास सुट्टे पैसे नसल्याने मर्यादा येत आहेत. बाजारात विक्रीसाठी माल घेऊन येणार शेतकरी तसेच माल करणारी ग्राहक दोघेही पाचशे हजाराच्या नोटा नाकारत असल्याने, आडत्यांची चांगलीच अडचण होत आहे. शेतकरी पट्टी घेत नाहीत, तर नेहमीच्या ग्राहकांकडेही सुट्टे नसल्याने मालाची विक्री करुन पैसे मात्र नंतर घ्यावे लागत आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत बाजारात सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी उधारीचे प्रमाण वाढले असल्याचे आडत्यांनी सांगितले.
सुट्या पैशामुळे व्यापाराचा तोटा होत असल्याच्या कारणामुळेच फळे, भाजीपाला, फुले, केळी, कांदा-बटाटा, पान आणि भुसार विभागातील आवक घटली आहे. अधिकचा माल घेऊन येणारे शेतकरी मात्र आडत्यांकडून धनादेश स्वीकारत आहेत. काही शेतकऱ्यांकडून मात्र रोख रकमेची मागणी होत आहे. त्यातही ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत. ‘बाजारात दोन दिवसाआड कोबी विक्रीसाठी आणतो. आम्ही व्यापाऱ्यांकडून एकदम महिन्याचे पैसे घेत असतो.
आज आणलेल्या मालाची एक हजार रुपयांची उचल घेतली. मात्र, सर्व नोटा १०० रुपयांच्या घेतल्या,’ असे खटाव तालुक्यातील शेतकरी अंकुश कोरडे यांनी सांगितले. तर किसन पांडेकर यांनीही आडत्यांकडून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Today in the mandaiite lending, tomorrow cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.