गॅस संपल्यावर चुली पेटविण्याची वेळ
By Admin | Updated: November 30, 2015 01:50 IST2015-11-30T01:50:49+5:302015-11-30T01:50:49+5:30
केंद्र शासनाने एक टाकी व दोन टाकीचे सरकारी गॅस कनेक्शन असणाऱ्या गॅसधारकांचे सर्रास रॉकेल बंद केल्याने महिलांना गॅस टाकी संपल्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी चुली पेटवाव्या लागत आहे

गॅस संपल्यावर चुली पेटविण्याची वेळ
अवसरी : केंद्र शासनाने एक टाकी व दोन टाकीचे सरकारी गॅस कनेक्शन असणाऱ्या गॅसधारकांचे सर्रास रॉकेल बंद केल्याने महिलांना गॅस टाकी संपल्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी चुली पेटवाव्या लागत आहे. शासनाने रेशनकार्डवर कमीत कमी २ लीटर तरी रॉकेल द्यावे, अशी मागणी गॅसधारक करत आहेत. तालुका पुरवठा विभागामार्फत रॉकेल परवानाधारकांकडे रॉकेलचा भरलेल्या टँकर पाठवितात. मग रॉकेल जाते कुठे व कुणाला विकले यांची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी ग्राहक करत आहेत.
ग्रामीण भागात खेडोपाडी दहा वर्षापुर्वी सर्रास कौलारू घरे होती.परंतु आता तालुक्यात डिंभा धरण झाल्याने तालुक्यातुन डिंभा अजवा कालवा व घोडनदी पाण्याने बारमाही वाहत असते.त्यामुळे जिरायती क्षेत्र बागायती झाल्याने तालुक्यात आर्थिक परिस्थिती सुधारणा आहे.पुर्वी शेतात कापडी मांडव टाकुन होणारी लग्ने आता मंगल कार्यालयात होऊ लागली.तर कौलारू घरे जाऊन सिमेंट काँक्रेटची घरे झाल्याने घरात चुली पेटविणे अवघड होऊन बसले आहे.
रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास मेणबत्तीची आधार घ्यावा लागत आहे.केंद्र शासनाने ग्रामीण भागातील कुटुंबियांना दर महिन्याला रेशनकार्डवर कमीत कमी २ ते ४ लिटर रॉकेल द्यावे या बाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हिवाळी अधिवेशनात आवाज ऊठवावा अशी मागणी सर्व सामान्य जनता करत आहे. (वार्ताहर)