न्यायासाठी त्यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ
By Admin | Updated: February 13, 2017 01:16 IST2017-02-13T01:16:23+5:302017-02-13T01:16:23+5:30
दोन वर्षांपूर्वी एसटी बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस नुकसानभरपाईसाठीआता स्वारगेट आगाराचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

न्यायासाठी त्यांच्यावर दारोदार फिरण्याची वेळ
बारामती : दोन वर्षांपूर्वी एसटी बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस नुकसानभरपाईसाठीआता स्वारगेट आगाराचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अनेक हेलपाटे मारूनदेखील एसटीचे अधिकारी दखल घेत नाहीत. अपघातामुळे एक कान निकामी झाला आहे. खासगी नोकरी गेली, त्यामुळे उपजीविकेचादेखील प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे न्यायासाठी या व्यक्तीला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.
चिखली (ता. इंदापूर) येथील रहिवासी असलेले मधुकर जगन्नाथ हुंबे असे या व्यक्तीचे नाव आहे. दादर-स्वारगेट या शिवनेरी बसमधून ते १८ जून २०१५ ला पुण्याच्या दिशेने येत होते. प्रवासादरम्यान उर्से टोलनाक्यानजीक या बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसचा चालक जागीच ठार झाला होता, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या गंभीर जखमींमध्ये हुंबे यांचादेखील समावेश होता. हुंबे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमी अवस्थेतच त्यांना निगडी येथील लोकमान्य रुग्णालायात दाखल केले.
प्रथमोपचारानंतर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालायात त्यांना दाखल केले गेले. स्वारगेट एसटी आगाराचे तत्कालीन आगार व्यवस्थापक प्रताप सावंत यांनी हुंबे यांची भेट घेऊन १ हजार रुपयांची तातडीची मदत दिली. तसेच ‘तुम्ही तुमच्या गावी उपचार घ्या. उपचाराच्या खर्चाचे तपशील रुग्णालयाकडून मिळाल्यानंतर आणून द्या. तुम्हाला नुकसानभरपाई दिली जाईल,’ असे सांगितले. (प्रतिनिधी)