सरदवाडीवर पाणी विकत घेण्याची वेळ

By Admin | Updated: May 26, 2014 05:27 IST2014-05-26T05:27:46+5:302014-05-26T05:27:46+5:30

पंचतारांकित दर्जा असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारवायांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली.

Time to buy water at Sardarwadi | सरदवाडीवर पाणी विकत घेण्याची वेळ

सरदवाडीवर पाणी विकत घेण्याची वेळ

प्रवीण गायकवाड, शिरूर - पंचतारांकित दर्जा असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारवायांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. मात्र, गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे प्रभावित झालेल्या गावांपैकी सरदवाडी गावांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. ज्यांची ऐपत आहे, त्याचं ठीक आहे, ज्यांची नाही, त्या नागरिकांना मात्र हे दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नसल्याचे वास्तव आहे. २000मध्ये सुरू झालेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सध्या २५0 ते ३00 कारखाने सुरू आहेत. या वसाहतीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे सरदवाडी गाव. कारखानदारी येण्याअगोदर पाण्याची परिस्थिती चांगली होती. विहिरीचे स्रोत चांगले होते. पिण्याचे पाणी, शेतीला पाणी, सर्व काही योग्य होते. मात्र, एमआयडीसीतील कारखान्यांचे दूषित पाणी या गावच्या ओढ्यात येऊन मिळू लागले आणि विहिरींचे पाणीच खराब झाले. परक्युलेशनमुळे या ओढ्यातील दूषित पाणी या विहिरीत मिसळू लागले. केमिकलयुक्त काळे पाणी बघून पाणी पिण्याची इच्छा होईल तरी कशी? मजबुरी म्हणून पिलेच, तर विविध विकारांना आमंत्रण. पुणे-अहमदनगर रस्त्यावर वसलेल्या या गावात हॉटेल व्यवसायामुळे आर्थिक सुबत्ता आलेली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी विकत घेण्यास सुरुवात केली. १ रुपया प्रतिलीटर, असे २0 लिटरचा कॅन २0 रुपयांना ही ग्रामस्थ मंडळी विकत घेतात. या गावचे दीपक सरोदे म्हणाले, दूषित पाण्यामुळे गावावर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. अनेकांनी पाणी शुद्धीकरण यंत्रणा घरात बसवली. मात्र, पाण्याचे टीडीएस दोन हजारांपेक्षा जास्त असल्याने (दूषित पाण्याचे जास्त प्रमाण) ही यंत्रणा दोन महिन्यांतच खराब होऊ लागल्याने या यंत्रणेचाही फायदा होईना. सर्वांनाच पाणी विकत घेणे शक्य नाही. एमआयडीसी जवळ असल्याने सरदवाडी परिसरात कामगारवर्ग वसू लागला आहे. या कामगारांना पाणी विकत घेणे परवडणारे नाही. कामावर गेल्यावर येताना कारखान्यातूनच पिण्याच्या पाण्याचे कॅन भरून ते आणतात. आर्थिक दुर्बल घटकाला हेपण शक्य नाही. त्यांनी काय करावे हा प्रश्न आहे.

Web Title: Time to buy water at Sardarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.