विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ
By Admin | Updated: April 5, 2016 01:04 IST2016-04-05T01:04:42+5:302016-04-05T01:04:42+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज जमा करून घेण्याबाबत ताठर भूमिका घेतली जात असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज जमा करून घेण्याबाबत ताठर भूमिका घेतली जात असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. परीक्षेला बसू देण्याबाबत विद्यापीठाची कोणतीही हरकत नसताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून
मात्र विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे आॅनलाईन अर्ज भरण्याबाबत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरणे अपेक्षित आहे.मात्र, आर्थिक व कौटुंबिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेला नाही. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न करता परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठात पाठविले जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परीक्षा विभागात विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. वाडिया महाविद्यालयातील बीबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी व सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांची भेट घेऊन याबाबत विनंती केली. मात्र, महाविद्यालयाकडूनच नकार येत असल्याने परीक्षा नियंत्रक हतबल आहेत.
विद्यापीठाने प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाकडे सोपविली आहे. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याचा परीक्षा अर्ज नाकारावा आणि कोणत्या विद्यार्थ्याचा स्वीकारावा हे सर्वस्वी प्राचार्यांच्या हातात आहे. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ ते २0 दिवसांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, विद्यापीठाने लेखी पत्र दिले तरच विद्यार्थ्यांचा अर्ज भरून घेतला जाईल, असे वाडिया कॉलेजच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.