तीळगुळाने स्नेहभाव दृढ
By Admin | Updated: January 16, 2015 02:42 IST2015-01-16T02:42:54+5:302015-01-16T02:42:54+5:30
शहर आणि परिसरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने, उत्साहात महिलांनी मकरसंक्रात साजरी केली. शहरातील विविध मंदिरात सुगडी पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती

तीळगुळाने स्नेहभाव दृढ
पिंपरी : शहर आणि परिसरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने, उत्साहात महिलांनी मकरसंक्रात साजरी केली. शहरातील विविध मंदिरात सुगडी पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती. हळदी-कुंकवाने सणाला प्रारंभ करण्यात आला. ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत तिळगुळाचे वाटप करण्यात आले.
यंदा मकरसंक्रात एक दिवस उशिरा साजरी करण्यात आली. पण सणातील पारंपरिक उत्साह कायम होता. महिलांनी शहरातील मोरया गोसावी समाधी मंदिर, शितळादेवी मंदिर, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, गणेश मंदिर, दुर्गा माता मंदिरात पूजेसाठी गर्दी केली होती. महिलांनी घरासमोर व मंदिरासमोर रांगोळी काढली. पाच सुगडीत
गव्हाचे ओंबे, ज्वारींची कणस,
तिळगूळ, गाजर, ऊस, हरभरा टाकून फुलांनी सूप सजवले होते. हे सूप घेऊन महिलांनी मंदिरात सुगडी-सुपाचे पूजन केले. मंदिरात मूर्तीसमोरमोठ्या आनंदात एकमेकींना हळदी-कुंकू लावले. सुगडी, वाण एकमेकींना देऊन संक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी मंदिरांत उपस्थित ज्येष्ठ महिलांचे आशीर्वाद घेतले. मंदिरातील तुळशीसमोर व मूर्तीसमोर एक एक सुगडी ठेवून पूजन केले. यातच काही महिलांनी मंदिरात उखाणे घेऊन पारंपरिकता जपली.
घराघरांतही आनंदात कुटुंबीयांसमवेत सक्रांत साजरी केली. तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की अशा विविध पाककृतींनी मित्रपरिवार, कुटुंबीयांत मकरसंक्रात साजरी केली. संक्रातीचे खास आकर्षण असणारे पतंग उडवण्याचा आनंद अनेकांनी घेतला.
वल्लभनगर आगारात तिळगूळ वाटप
नेहरूनगर : वल्लभनगर एसटी आगारामध्ये प्रवाशांना तिळगूळ वाटून मकरसंक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रवाशांशी नाते अधिक गोड व्हावे म्हणून मकरसंक्रांत सणाच्या निमित्ताने आगारामध्ये सकाळी प्रत्येक प्रवाशाला तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या गोड गोड बोला... मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी आगारप्रमुख आर. डी. शेलोत, स्थानकप्रमुख रोहिणी जाधव, वाहतूक नियंत्रक आर. वाय. शेख, आय. पी. तांबोळी, आर. टी. जाधव, आर. के. गेंजगे, के. एस. कांबळे, ए. एम. शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या (भोसरी विभाग) वतीने भोसरी, निगडी परिसरातील पोलीस चौकीत जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या महिला सरचिटणीस आशा काळे, निगडी मंडल अध्यक्षा सारिका पवार, भोसरी मंडल अध्यक्षा सरिता शर्मा, गीता महेंद्रू, वैशाली मोरे आदी उपस्थित होत्या.
सुगडदान करण्यास महिलांची गर्दी
किवळे : विकासनगर , किवळे, रावेत , मामुर्डी , साईनगर ,गहुंजे व सांगवडे परिसरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . शहरी व ग्रामीण भागात सुवासिनी स्त्रियांनी घराजवळ असणार्या देव -देवतांच्या मंदिरांत सुगडदान करण्यासाठी गर्दी केली होती. परिसरातील बहुतांशी सुवासिनी स्त्रिया श्रीक्षेत्र देहू , आळंदी , शिरगाव व घोरवडेश्वर डोंगरावरील मंदिरात सुगडदान करण्यासाठी गेल्या होत्या . ज्या कुटुंबात मुलीचे लग्न झाल्यावर पहिले वर्ष आहे, त्यांच्या सासरहून त्या मुलीला साडी व ह्यववसा ह्य आल्याचे दिसत होते. ( ववसा म्हणजे ऊस , गाजर ,हरबरा , बोरे ,गव्हाच्या ओंब्या , व तिळगुळ आदी.) भावकीतील व आळीतील सुवासिनी स्त्रियांना ववसा पाहण्यासाठी बोलावण्याची स्त्रियांची लगबग जाणवत होती.
तसेच ज्या कुटुंबातील मुलाचे लग्न झाल्यावर पहिले वर्ष आहे, त्यांच्या घरी सबंधित मुलीकडे साडी व ववसा पाठविण्याची लगबग दिसत होती.
मकर संक्रांत हा स्नेह वाढविणारा सण असल्याने व परंपरेने सुवासिनी स्त्रियांनी हळदी कुंकू , तिळगुळ व नित्योपयोगी वस्तू एकमेकींना भेट म्हणून दिल्या . लहान मुले व पुरुष मंडळींही आपल्या मित्र -मैत्रिणींना तिळगुळ देत तिळगुळ घ्या, गोड बोला असे आवर्जून सांगत होते. मकर संक्रांतीला तिळाचे महत्व विशेष असून तिळाच्या अंगी जशी स्निग्धता आहे, तशी स्निग्धता स्नेह रूपाने आपल्या मित्र मंडळींमध्ये निर्माण व्हावी अशी यामागे प्रत्येकाची भावना असते .
(वार्ताहर)