इंदापूर पोलीस ठाण्यात नो-पार्किंगच्या नियमांना तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:22+5:302021-01-13T04:25:22+5:30
बाभूळगाव : इंदापूर पोलीस प्रशासनाकडून वाहतूक व नो-पार्किंग नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना ...

इंदापूर पोलीस ठाण्यात नो-पार्किंगच्या नियमांना तिलांजली
बाभूळगाव : इंदापूर पोलीस प्रशासनाकडून वाहतूक व नो-पार्किंग नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना वाहनचालक व नागरिकांना वारंवार देण्यात येत असतात. प्रसंगी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा पोलिसांकडून उगारला जातो. परंतु इंदापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने नो-पार्किंगच्या नियमाला तिलांजली दिली जात आहे. दुसऱ्याला वाहतूक व नो-पार्किंग नियमांचे पालन करायला लावणारे इंदापूर पोलीस स्वत: मात्र नियमांचे पालन करण्यात असमर्थ असल्याचे चित्र सध्या इंदापूर पोलीस ठाण्यात दररोज पाहायला मिळत आहे.
इंदापूर शहरात नागरिकांनी वाहतूक व नो-पार्किंग नियमांचे पालन करणेविषयीचे नामफलक बोर्ड संबंधित प्रशासनाकडून जागोजागी लावलेले आहेत. तर आनेकवेळा नो-पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देऊन पोलीसमामाकडून दंडात्मक कारवाई होत असताना आपण पहात असतो. परंतु इंदापूर पोलीस ठाण्यात याच्या विरुद्ध नियम लागू असल्याचे चित्र पाहायला मिळत असून नो-पार्किंग, मोटारसायकल पार्किंग, चारचाकी वाहन पार्किंग या ठिकाणी कोणतेही व कसलेही वाहन पार्किंग केले तरी इथे मात्र वाहतूक नियमांच्या उल्लंघनातून चक्क सुट मिळत असल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर पोलीस ठाण्यात कोणीही, कसेही या आणि मनमानेल त्या पद्धतीने पार्किंग नियमांचे उल्लंघन करून वाहन कसेही पार्किंग करा ईथे सर्वांना सुट असल्याचे चित्र दिसून येत आहे.पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दिमतीला ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व मोठ्याप्रमाणात महिला व पुरुष पोलीस कर्मचारी व होमगार्ड ताफा असताना एकही अधिकारी अथवा पोलीस कर्मचार्याचे या प्रकाराकडे लक्ष नाही याचे सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. गावाला शिस्तीचे धडे देणारे पोलीस स्व:तच्याच दारात बेशिस्त वागत असल्याचा प्रकार हा खरोखरच सर्वांना विचार करायला लावणारा असल्याचे दिसून येत आहे.