दिवसभर संततधार
By Admin | Updated: June 22, 2015 04:32 IST2015-06-22T04:32:10+5:302015-06-22T04:32:10+5:30
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांत रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे सुटीचा दिवस शहरवासीयांना घरातच घालवावा लागला

दिवसभर संततधार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांत रविवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे सुटीचा दिवस शहरवासीयांना घरातच घालवावा लागला. संततधार सुरू असल्याने पिंपरी आणि चिंचवड परिसरातील विजेचा लपंडाव सुरू होता. ग्रामीण भागातही पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पेरणीसाठी आणखी पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मॉन्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले; मात्र अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. दररोज आकाशात काळे ढग दाटून येतात. मात्र, जोरदार पाऊस होत नाही. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसास सुरूवात झाली. रविवारी सकाळ काही काळ उघडीप मिळाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच उकाडाही जाणवत होता. सकाळी साडेनऊनंतर संततधार सुरू झाली. कधी जोरदार, तर कधी हलक्या सरी दिवसभर पडत होत्या. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक होता. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या. अचानकपणे आल्याने पावसाने कामानिमित्त बाहेर पडलेल्यांची गैरसोय झाली.
विजेचा लपंडाव
पाऊस सुरू असल्याने चिंचवड आणि पिंपरी परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. पिंपरीतील खराळवाडी, मोरवाडी, कॅम्प परिसरातील वीज दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळात वीज अधूनमधून गायब होत होती. चिंचवड गावठाण, बिजलीनगर, पवनानगर, उद्योगनगर, भोईरनगर परिसरातील वीज दुपारी बाराला गायब झाली. ती सायंकाळी साडेपाचपर्यंत बंद होती. असाच प्रकार वाल्हेकरवाडी परिसरातही सुरू होता.
पिंपरी बाजारपेठेत गर्दी कमी
सुटीच्या दिवशी पिंपरीतील बाजारपेठेत पाय ठेवायला जागा नसते. शगुन, साई चौक, जिजामाता रुग्णालय चौकात वाहनांची गर्दी होत असतो. मात्र, पाऊस सुरू असल्याचा परिणाम गर्दीवर झाल्याचे दिसून आले. रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. सुटी असतानाही नागरिकांना घराबाहेर न पडणेच पसंद केले. सुटीच्या दिवशी सायंकाळी शहरातील उद्याने गर्दीने बहरलेली असतात. मात्र, निगडीतील भक्ती-शक्ती, थेरगावातील डांगे चौक, पिंपळे गुरव येथील डायनासोर उद्यानात गर्दी नव्हती. तसेच या उद्यानांबाहेर असणाऱ्या मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळणी आणि नाष्ट्यांच्या हातगाड्याही नव्हत्या. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या हातगाडीवाल्याचे नुकसान झाले.
सखल भागात पाणी
भोसरी परिसरातील गावठाण, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, एमआयडीसी, चक्रपाणी वसाहत, दिघी रोड या परिसरात दिवसभर संततधार सुरू होती. सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुख्य चौकातील सायंकाळी असणाऱ्या गर्दीवरही पावसाचा परिणाम दिसून आला.
मंडईत चिखल
पिंपरीतील भाजी मंडईबाहेर चिखल झाला होता. विके्रतेही प्लॅस्टिक कागद डोक्यावर घेऊन भाजी विकत होते. चिखलामुळे भाजी खरेदीला येणाऱ्यांना त्रास होत होता. मोशी भाजी मंडईतही पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मोशी, चऱ्होलीच्या ग्रामीण भागात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, सांगवी, दापोडी, संत तुकारामनगर, चिंचवड स्टेशन, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, चिखली, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, आकुर्डी निगडी परिसरातही पाऊस झाला.