चोरीच्या पैशांतून महाराष्ट्र दर्शन
By Admin | Updated: April 16, 2015 00:01 IST2015-04-15T23:16:17+5:302015-04-16T00:01:07+5:30
पुण्यातील चोरट्याने लुटलेल्या रकमेतून केली ऐश, पोलिसांची पळापळ

चोरीच्या पैशांतून महाराष्ट्र दर्शन
लांजा : पुणे येथील नामांकित कंपनीच्या मॅनेजरच्या गाडीवरील चालकाने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लंपास केले होते. पुणे पोलिसांना संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा शोध घेतला. अखेर तो लांजा येथे सापडल्याने पुणे पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
पुणे येथील कंपनीच्या मॅनेजरच्या गाडीचा चालक तुकाराम दशरथ चव्हाण यांनी २८ लाख रुपयांची रोकड लंपास करुन आपल्या कुटुंबीयांसह पोबारा केला होता. तुकाराम चव्हाण हा सातारा, सांगली, कर्नाटक, मुंबई असा फिरत असल्याने त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरून पुणे पोलीस याचा शोध घेत होते. चव्हाण हा नेहमीच राहण्याच्या जागा बदलत असल्याने पुणे पोलीसदेखील त्याच्या मागे अखंड महाराष्ट्रभर फिरत होते.मंगळवारपासून तुकाराम चव्हाण याचे लांजा मोबाईलचे स्थान मिळत होते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. काळे आणि त्यांचे सहकारी यांनी आज याला पकडायचेच, असा जणू चंग बांधून बुधवारी दुपारी त्याला एका लॉजवर अटक केली. (प्रतिनिधी)
पुणे येथील नामांकित कंपनीच्या मॅनेजरच्या गाडीवरील चालकाने तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लंपास.
मोबाईलच्या लोकेशनवरून पुणे पोलीस घेत होते शोध.
तुकाराम चव्हाण याने लंपास केलेल्या पैशातून एक तवेरा गाडी देखील खरेदी केल्याचे स्पष्ट.
लांजा येथेदेखील आपल्या ओळखी वाढवून जमीन खरेदी करण्याचा होता बेत.
आधी गाडी, मग जमीन खरेदीचा बेत
चव्हाण याने लंपास केलेल्या पैशातून एक तवेरा गाडीदेखील खरेदी केल्याचे स्पष्ट झाले असून, लांजा येथे त्याने आपली ओळख वाढवून जमीन खरेदी करण्याचा बेत आखला होता. मात्र, या ठिकाणी पुणे पोलीस पथक दाखल होऊन त्याला अटक केल्याने त्याचा पुढील सगळाच बेत फसला आहे. मोबाईलच्या लोकेशनवरून शोध घेण्यात आला.