‘थ्रिल’ आले युवकांच्या अंगलट...!
By Admin | Updated: January 28, 2015 02:34 IST2015-01-28T02:34:54+5:302015-01-28T02:34:54+5:30
सिंहगडावर फिरताना दाखविलेल्या भलत्याच ‘थ्रिल’मुळे दोन पर्यटक युवक धोकादायक कड्यावरून घसरले. मात्र, सुदैवाने एका झाडाला ते अडकले

‘थ्रिल’ आले युवकांच्या अंगलट...!
खडकवासला : सिंहगडावर फिरताना दाखविलेल्या भलत्याच ‘थ्रिल’मुळे दोन पर्यटक युवक धोकादायक कड्यावरून घसरले. मात्र, सुदैवाने एका झाडाला ते अडकले. वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले.
प्रजासत्ताक दिनी चाकण येथील सात जणांचा एक ग्रुप सिंहगडावर आला होता. सहलीसाठी आलेल्यांची संख्याही सोमवारी जास्त होती. गड फिरताना दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांच्यातील संतोष विश्वंभर बराटे हा दोन नंबरच्या दरवाजापासून पुढच्या बाजूच्या अवघड कड्यातून खालचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी उतरला. मात्र, हा धाडसी प्रयोग त्याच्या अंगलट आला. तो खाली घसरू लागला. त्याला वर येता येईना, म्हणून त्याचा मित्र अतुल भीमराव गवळी हाही खाली उतरला. धोकादायक कडा व खाली खोल दरी यांमुळे त्याला त्या मित्राची मदतही करता येईना व स्वता:लाही पुन्हा वर येता येईना. हे पाहून विशाल लायगुडे, सचिन निम्हण, अमित बरडे, ज्ञानेश्वर गावडे, विश्वजित गवळी हे मित्र घाबरले. त्यांनी तातडीने वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांशी संपर्क साधला.
तोपर्यंत बघ्यांची गर्दीही जमली. घाटरस्त्यावरील वाहनांची गर्दी, वाहतूककोंडी यांमुळे वन समितीचे बहुतांश कर्मचारीही वाहतूक सुरळीत करण्यात अडकले होते. त्यामुळे रॉकक्लायम्बिंगचा वाहनतळावर सुरू असलेला साहसी उपक्रम थांबवून काही कर्मचारी या तरुणांच्या मदतीसाठी गडावर धावले. वन समितीचे सुरक्षारक्षक व टे्रकर्स संजय गायकवाड, नीलेश सांगळे हे दोराच्या साह्याने सुमारे ५० ते ६० फूट खाली कड्यात उतरले. त्यांनी कड्यात फसलेले संतोष व अतुल यांना धीर देऊन सुखरूप वर घेऊन येण्याचा प्रयत्न सुरू केला. पर्यटकांच्या गर्दीने ते दोघेही अधिक घाबरू लागले. गायकवाड यांनी त्यांना सुरक्षेची आवश्यक ती साधने देऊन दोर लावून वर आणण्यास सुरुवात केली.
दरम्यान, नंदू जोरकर, शंकर पढेर, बबन मरगळे, धनराज सांबरे, उत्तम खामकर, हेमंत -पिंटू गोळे इतर सुरक्षारक्षक दोराच्या साह्याने त्या दोघांना वर घेण्यासाठी प्रयत्न करू लागले. अखेर दीड तासाच्या प्रयत्नांनंतर त्या दोघांना सुखरूप वर आणले. या दोघांच्या या थ्रिलमुळे मात्र वनसंरक्षण समितीच्या कर्मचाऱ्यांचे घाटातील वाहतुकीचे नियोजन काहीसे कोलमडले. परंतु, युवकांचा जीव वाचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(प्रतिनिधी)