पुणे शहर कॉपीमुक्तीच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: March 11, 2015 01:06 IST2015-03-11T01:06:59+5:302015-03-11T01:06:59+5:30
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत पालक अधिक जागरूक आहेत.

पुणे शहर कॉपीमुक्तीच्या उंबरठ्यावर
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत पालक अधिक जागरूक आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याने परीक्षेदरम्यान गैरप्रकार करून उत्तीर्ण होऊ नये, याची काळजी त्यांच्याकडून घेतली जाते. त्याचप्रमाणे राज्य शिक्षण मंडळाकडून ‘गैरमार्गाविरोधात लढा’ उपक्रमांतर्गत जनजागृती केली जात आहे. यामुळे पुणे शहर कॉपीमुक्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. दहावीच्या गणित विषयाच्या पेपरदरम्यान ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत शहरातील विविध ठिकाणी शांततेप परीक्षा सुरू असल्याचे दिसून आले.
पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूल हे एकच संवेदनशील परीक्षा केंद्र आहे. शहरातील इतर सर्व परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा घेतल्या जातात. त्याचप्रमाणे शहरातील बहुतांश शाळा बंदिस्त स्वरूपात आहेत. मंडळाचे अधिकारी तसेच शाळा प्रशासनातर्फे परीक्षा केंद्रात कॉप्या होऊ नयेत, याची काळजी घेतली जाते. तसेच, परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यासुद्धा काम करतात. त्यामुळे पुणे शहरात तुरळक ठिकाणी कॉपीचे प्रकार घडल्याचे दिसून येत. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मंगळवारी दहावीच्या गणित विषयाच्या परीक्षेची पाहणी केली. त्यात सर्व ठिकाणी सुरळीत परीक्षा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
औंध येथील शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात परीक्षेमुळे सामसूम होती. कोणीही शाळेत प्रवेश करू नये म्हणून शिपाई प्रवेशद्वारावर बसलेला होते. तसेच, खडकीतील आलेगावकर शाळेमध्येही परीक्षेनिमित्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशीच स्थिती सेंट मेरी हायस्कूलमध्येही होती.
शहरातील मध्यवर्ती परीक्षा केंद्रांची पाहणी केली असता, बाहेरील व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणे किंवा इतर मार्गांनी मदत करणे अशक्य असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना गैरमार्गाने सहाय्य होणार नाही, याची दक्षता केंद्रांवर घेण्यात आली होती. शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील रमणबाग प्रशाला, अहिल्यादेवी प्रशाला तसेच अन्य काही परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा सुरू असताना बाहेरून कॉपी पुरविणे शक्य होत नाही किंवा तसे धाडसही कुणी करीत नसल्याचे आढळले. (प्रतिनिधी)