तीन हजार फुटांचा सुळका केला सर!
By Admin | Updated: March 23, 2017 04:06 IST2017-03-23T04:06:18+5:302017-03-23T04:06:18+5:30
तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा किल्ला (सुळका) सर करण्याची किमया येथील चार युवकांनी करून दाखवली आहे. किल्ला सर

तीन हजार फुटांचा सुळका केला सर!
शिरूर : तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा किल्ला (सुळका) सर करण्याची किमया येथील चार युवकांनी करून दाखवली आहे. किल्ला सर करण्याची मनात भीती होती. मात्र काहीही झाले तरी किल्ला सर करण्याचा मनी निश्चयच केला. त्यामुळे यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया यापैकी कुणाल काळे या युवकाने दिली.
रायगड, तोरणा व राजगड या तीन किल्ल्यांनी वेढा घातलेला किल्ला म्हणजे लिंगाणा किल्ला. आभाळात घुसू पाहणारा हा सुळका पाहताच मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा सुळका सर करायचे धाडस फारसे कोणी करत नाही. तरीही अनेकांनी हा किल्ला सर केला आहे. कुणाल काळे, भूषण खैरे, अलोक वारे व योगेश फाळके या येथील चार युवकांना ट्रेकिंगची आवड आहे. यामुळे ते दर दोन महिन्याला राज्यातील वेगवेगळ्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जातात. छोटे-मोठे किल्ले त्यांनी सर केले. यातून अनेक नवे मित्र बनत गेले. फेसबुकवर अशा मित्रांचा ग्रुप तयार झाला. फेसबुकवरच पुणे येथील गडसंवर्धनाची कामे करणाऱ्या ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ची माहिती या युवकांना मिळाली. यातूनच प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, अध्यक्ष गणेश खुटवड यांची भेट झाली. यानंतर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लिंगाणा सर करण्याच्या मोहिमेत या चौघांनी सहभाग घेतला.
मोठा किल्ला सर करण्याचा अनुभव नव्हता. मात्र मनात निर्धार केला. लिंगाण्याच्या रौद्ररूपाची कल्पना होती. प्रत्यक्षात मोहिमेवर निघालो असता, मनात आमच्या भीती होती.
मात्र सुरुवात केली, असे कुणालने सांगितले. प्रथम सर्व जण सिंगापूर गावात जमले. दीड तासात बोराटाची नाळ पार केली. पायथ्याला पोहोचले. तेथून किल्ला चढाईला सुरुवात केली. संध्याकाळी डोंगराच्या कुशीत असलेल्या गुहेत त्यांनी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला पुन्हा डोंगर चढाई सुरू करण्यात आली. खडतर चढाई करत अखेर ध्येयपूर्ती केली. पहिलाच अनुभव असल्याने प्रत्येक जणाने थरारक अनुभव घेतला. अवघड व जीवावर बेतू शकणारी मोहीम फत्ते केल्याचे समाधान असल्याचे कुणालने सांगितले. (वार्ताहर)