छत्रपती शिवाजी महाराजांची तीन शिवकालीन चित्रे प्रकाशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:34+5:302021-06-16T04:13:34+5:30
पुणे : महाराष्ट्रापासून दूर परदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन समकालीन चित्रे संशोधकांना गवसली आहेत. ही चित्रे सतराव्या शतकातील ...

छत्रपती शिवाजी महाराजांची तीन शिवकालीन चित्रे प्रकाशात
पुणे : महाराष्ट्रापासून दूर परदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन समकालीन चित्रे संशोधकांना गवसली आहेत. ही चित्रे सतराव्या शतकातील असून भारतातील दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली व मिनिएचर प्रकारची आहेत. भारतात आलेल्या तत्कालीन युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ती युरोपमध्ये हस्तांतरित झाली व नंतर वेगवेगळ्या वस्तुसंग्रहालयांत सुरक्षितपणे सांभाळून ठेवली गेली. या अप्रतिम कलाकृतींचा नजराणा असलेल्या शिवछत्रपतींच्या चित्रांचे संशोधन इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी केले आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत प्रसाद तारे यांनी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यवाह पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. तारे म्हणाले की, शिवकाळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यांपैकी कुतुबशाहाची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या प्रदीर्घ मोहिमेवर गेले असताना ही चित्रे काढलेली आहेत किंवा त्या वेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इसवीस न १७०० पर्यंत काढलेली आहे.
पुढे तारे म्हणाले, या चित्रांच्या म्युझियम रेकॉर्डमध्ये ती चित्रे महाराजांची व सतराव्या शतकातील आहेत, असे स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच ती दख्खनी गोवळकोंडा शैलीची आहेत, असेही म्हटले आहे. त्यातील दोन चित्रांमध्ये पर्शियन व रोमन लिपीत महाराजांचे नाव चित्रांमध्ये लिहिलेले आहे. महाराजांव्यतिरिक्त अन्य अनेक भारतीय राजपुरुषांची चित्रे या वस्तुसंग्रहालयामध्ये आहेत. ही सर्व चित्रे नैसर्गिक रंग आणि सोने वापरून काढलेली आहेत. चित्रांचे चित्रकार अज्ञात आहेत. त्यातील एका चित्रासाठी पॅरिस येथील अभ्यासक शशी धर्माधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार व पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी व गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे मोजकेच अलंकार त्यांनी धारण केलेले दिसून येतात. करारी मुद्रा, बोलके डोळे व चेहऱ्यावरचे स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्ये चित्रातदेखील दिसून येतात, असेही तारे यांनी या वेळी सांगितले.
चौकट
चित्र १- जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील प्रस्तुत चित्रात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखविली आहे.
चित्र २ - पॅरिस येथील खाजगी वस्तुसंग्रहालयातील या चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र दाखविले आहे.
चित्र ३ - अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहातील या चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र व कमरेला कट्यार दाखविली आहे. युरोपमधून हे चित्र पुढे अमेरिकेत हस्तांतरित झाले.
कोट
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अमूल्य ठेवा मिळाल्याने इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे. ही चित्रे समकालीन असल्याने त्यांचे ऐतिहासिक मूल्य खूप आहे.
- पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक व अभ्यासक.
कोट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपलब्ध सर्व शिवकालीन चित्रांवर सविस्तर वर्णनपर पुस्तक प्रसाद तारे लवकरच प्रकाशित करत आहेत. ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य असून, त्यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित दोन शिवकालीन शिलालेखांचे शोध लावले आहेत.
- प्रसाद तारे, इतिहास अभ्यासक
फोटो - शिवाजी महाराज चित्रे